एकाच कार्डवरुन काढता येणार बस आणि मेट्रोचं तिकीट; पुणेकरांसाठी 'वन पुणे कार्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:59 IST2025-09-30T20:52:41+5:302025-09-30T20:59:57+5:30

One Pune Card: मेट्रो आणि बसमधून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांसाठी पीएमपी व महामेट्रो यांच्याकडून एकत्रित तिकीट प्रणाली विकसित केली जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवाशांना मेट्रो किंवा बस यासाठी एकाच कार्डवर प्रवास करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे एकाच कार्डवर दोन्ही ठिकाणी प्रवास करु शकतात.

सध्या प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना आणि 'पीएमपी'तून प्रवास करताना वेगवेगळे तिकीट काढावे लागते.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या परिसरात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सार्वजनिक बस सेवा दिली जाते. तर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो सेवा पुरवली जाते.

मात्र या सेवांसाठी वेगवेगळ्या अॅपचा वापर करुन तिकीटे काढावी लागतात. मार्च २०२६पर्यंत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रवाशांना त्या मेट्रोचेही वेगळे तिकीट काढून प्रवास करावा लागू शकतो.

त्यामुळे प्रवास करताना वेगवेगळी तिकिटे काढून प्रवास करण्याचा त्रास कमी करण्यासाठी तीन यंत्रणांकडून 'वन पुणे कार्डा'वरच सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकाच अॅपवरून तिन्ही सेवांची तिकिटे काढता यावीत, यासाठी काम सुरू आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात पुणे मेट्रो आणि पीएमपी बस यासाठी एकच कार्ड वापरता येणार असून, त्यानंतर हिंजवडी मेट्रोचाही त्यात समावेश होणार आहे.