Nitin Gadkari: “सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 09:09 AM2021-08-20T09:09:15+5:302021-08-20T09:15:31+5:30

Nitin Gadkari: सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपली कार्यक्षमता आणि स्पष्टवक्तेपणामुळे अधिक ओळखले जातात. देशातील परिस्थिती, राजकारण आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशन अशा अनेकविध मुद्द्यावर एका कार्यक्रमात बोलताना रोखठोक मते मांडली.

देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भारताच्या लोकशाहीचे आदर्श आहेत. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते, असे गडकरी यांनी नमूद केले.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या गोंधळाबद्दल गडकरी बोलत होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुन दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सहागृह तहकूब करावे लागले होते.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करतानाची आठवण गडकरींनी सांगितली. एक वेळ अशी होती, जेव्हा सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा एकदा अटलजींना भेटलो होतो. ते मला म्हणाले की, लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही. लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मी सुद्धा पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे. मी माझ्या आयुष्यात इतकी वर्षे विरोधात काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आदराने वागले पाहिजे. संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे दुःख झाले, असे गडकरी म्हणाले.

सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके असतात. ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की विरोध देखील आवश्यक आहे.

म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदार विरोधकाचे काम केले पाहिजे, ही त्यांच्यासाठी माझी सदिच्छा आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, आता मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम कडक केले असून राज्यांना तयारी करण्याचे आदेश पाठविले आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे आहेत.

राज्यांमध्ये वाहतूक नियंत्रण संस्था, रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, मोटर वाहन नियमांमध्ये बदल केले त्यांचा उद्देश देशभरात नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे हा आहे.

नोटिफिकेशनमध्ये जवळपास १३२ शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १९ शहरे आहेत, आणि राज्य सर्वात वर आहे. यानंतर उत्तर प्रदेश १७ आणि आंध्र प्रदेश १३ शहरे आहेत.