नीरज चोप्राच्या 'भाल्या'ला ५ कोटींचा भाव; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू झालाय पदकविजेत्या खेळाडूंच्या वस्तुंचा लिलाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:31 AM2021-09-18T10:31:30+5:302021-09-18T10:35:20+5:30

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती.

नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक, पी व्ही सिंधू, लवलिना यांच्यासह कुस्तीपटू बजरंग पुनिया व पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाची कमाई केली.

ऑलिम्पिक स्पर्धेतील विक्रमी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकपटूंची भेट घेतली. या खेळाडूंसोबत मोदींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या व त्यांचे कौतुक केले. यावेळी नीरज चोप्रानं त्याचा ऑलिम्पिक स्पर्धेतील भाला, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं तिचं रॅकेट, लवलिना बोरगोईननं तिचा ग्लोव्हज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिले. त्या वस्तूंच्या लिलावाला कालपासून सुरूवात झाली.

नीरज चोप्राच्या भाल्याची १ कोटी मुळ किंमत ठेवली गेली होती आणि पहिल्याच दिवशी त्याच्यासाठी ५ कोटींची बोली लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला या वस्तूंच्या E-Auction ला सुरूवात झाली. २० दिवस हा लिलाव सुरू राहणार आहे आणि पहिल्याच दिवशी जवळपास १० कोटींची बोली लावली गेली.

कांस्यपदक विजेत्या लवलिनाच्या ग्लोव्हजसाठी सर्वाधिक ११ जणांनी बोली लावली, ८० लाख मुळ किंमत ठेवण्यात आलेल्या ग्लोव्हजसाठी आतापर्यंत १.९२ कोटींची बोली लावली गेली आहे.

पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलच्या भाल्याची मुळ किंमत १ कोटी होती आणि त्यासाठी १ कोटी ८ हजार बोली लागली. महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्या हॉकी स्टीकला १ कोटी १०० रुपयांची ( ८० लाख मुळ किंमत) बोली लागली.

या लिलावातून जमा होणारा पैसा 'नमामी गंगे' प्रकल्पात वापरण्यात येणार आहे.

Read in English