मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 07:51 IST2026-05-16T07:48:42+5:302026-05-16T07:51:34+5:30

हिरो म्हणजे तलवार, बंदूक चालवणारा माणूस नाही. प्रतिकूल परिस्थितीत प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठणारा खरा हिरो असतो. कार्व्हर तसा हिरो आहे !

‘Carver’ still gives something to the people! Special interview with writer Veena Gavankar | मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!

मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!

‘एक होता कार्व्हर’ची ५० वी आवृत्ती नुकतीच राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाली आहे. यानिमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी साधलेला संवाद.

‘एक होता कार्व्हर’ची ५०वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या टप्प्यावर तुमच्या मनात काय भावना आहेत? 

- ‘एक होता कार्व्हर’ लिहिताना माझ्या मनात लेखक होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. त्या काळात माझी मुलं दुसरी-तिसरीत होती. झोपताना त्यांना गोष्टी सांगण्याची आमच्या घरात पद्धत होती. त्यातूनच हे पुस्तक आकाराला आलं. मला मुलांना केवळ माहिती द्यायची नव्हती; तर ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येतो, हे दाखवायचं होतं. काही शिक्षकांनी हे लिखाण वाचून सांगितलं की, ग्रामीण भागातील मुलांना यामधून आत्मविश्वास मिळू शकतो. 

पुढे ‘माणूस’च्या दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झालं आणि त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. पुस्तक खेडोपाडी पोहोचलं. एका कुंभार दाम्पत्याने आपल्या मुलीसाठी हे पुस्तक विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिक्षिकेने स्वतःच्या पैशांनी ती प्रत आणून दिली. मला तेव्हाच जाणवलं की, लिखाण लोकांच्या आयुष्याला स्पर्श करू शकतं. अनेकांनी नैराश्यातून बाहेर पडताना किंवा आयुष्यात वेगळी दिशा निवडताना कार्व्हरचा प्रभाव असल्याचं सांगितलं.

कार्व्हर यांच्यावर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली?

- कार्व्हरच्या आयुष्यात मला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या.. स्वतःचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य आणि श्रमप्रतिष्ठा. कोणतंही काम कमीपणाचं नसतं, हे कार्व्हरच्या आयुष्यातून जिवंत उदाहरणासारखं दिसत होतं. मूल्यं केवळ उपदेशातून पोहोचत नाहीत; ती वास्तव कथांमधून पोहोचतात. म्हणूनच हे पुस्तक मुलांना आणि पुढे मोठ्यांनाही भावलं. अनेकांनी  कार्व्हर वाचून  वेगळे मार्ग निवडले. कुणी शेतीकडे वळलं, कुणी सामाजिक कामाकडे, तर कुणी संशोधनाच्या क्षेत्रात गेलं. लेखक म्हणून त्यापेक्षा मोठं समाधान काय असणार? 

कार्व्हर यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला सर्वाधिक कोणत्या गुणामुळे भावलं?

- कार्व्हरचं संपूर्ण व्यक्तिमत्त्वच प्रभावी वाटतं मला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊनही त्याने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. हाताला येईल ते काम शिकण्याची तयारी त्याच्यात होती. संगीत, विणकाम, मातीकाम अशा अनेक कौशल्यांनी त्याने स्वतःला समृद्ध केलं. माझ्यासाठी हिरो म्हणजे तलवार चालवणारा किंवा बंदूक उगारणारा माणूस नाही. प्रतिकूल परिस्थितीसमोर ठामपणे उभं राहून प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठणारा माणूस हा खरा हिरो आहे. कार्व्हरमध्ये मला तोच हिरो दिसला.

आजच्या काळात कार्व्हर यांचं जीवन तरुणांनी का वाचावं?

- मी कुणाला “हे वाचा” असं सांगत नाही. लोक स्वतःहून वाचतात, म्हणजे त्यांना त्यात स्वतःचं काहीतरी सापडत असावं. कार्व्हर म्हणजे केवळ शेती, संशोधन किंवा शेंगदाण्याचे प्रयोग नाहीत. कार्व्हर म्हणजे स्वतःला सापडणं. स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं. तडजोड न करता काम करणं. आजही खेडोपाड्यांत अनेक लोक शांतपणे समाजासाठी काम करताना दिसतात. कुणी शाळा चालवतं, कुणी सायकलवरून पुस्तकं वाटतं, कुणी शिक्षणासाठी आयुष्य झोकून देतं. ते सगळे त्यांच्या पद्धतीने कार्व्हरच आहेत. म्हणून मला वाटतं, कार्व्हरचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही.

लेखक आणि प्रकाशक यांचं नातं पुस्तकाच्या यशात किती महत्त्वाचं? 

- अत्यंत महत्त्वाचं. माझे विषय मुख्य प्रवाहातले नव्हते. पण राजहंसने त्यावर विश्वास ठेवला. आमच्यातील नातं हे विश्वासाचं आहे. मी विषय सुचविला की त्यांनी कधी “हे चालणार नाही” असं म्हटलं नाही. ‘गोल्डा’ आणि काही पुस्तकं इतर प्रकाशनांकडून आली, तरी आमच्या संबंधांत कधी दुरावा आला नाही. उलट त्यांनी त्या पुस्तकांचं कौतुकच केलं. 

चरित्रलेखन करू इच्छिणाऱ्या नव्या लेखकांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? 

- कोणता लेखनप्रकार निवडायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला चरित्र हा प्रकार आवडतो, कारण वास्तव आयुष्यातील माणसं मला अधिक आकर्षित करतात. आपल्याकडे कथा-कादंबऱ्यांमध्ये शास्त्रज्ञ, विचारवंत किंवा समाजपरिवर्तन करणारे लोकनायक म्हणून फारसे दिसत नाहीत. चरित्रलेखनासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. कट-पेस्ट करून चरित्र लिहिता येत नाही. इंटरनेटवर किंवा एआयवर मिळालेली माहिती जशीच्या तशी स्वीकारणं धोकादायक आहे. मूळ संदर्भ, क्रॉस रेफरन्स, तर्कबुद्धी आणि सखोल वाचन याशिवाय चांगलं चरित्र घडत नाही. वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित होते. आणि तीच लेखकासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. 
 

Web Title : साक्षात्कार: 'कार्व्हर' आज भी लोगों को प्रेरित करता है, समाज को कुछ देता है!

Web Summary : वीणा गवाणकर ने 'एक होता कार्व्हर' के स्थायी प्रभाव पर चर्चा की, इसके प्रेरणादायक मूल्य, आत्मनिर्भरता को बढ़ावा देने और आज के युवाओं के लिए प्रासंगिकता पर जोर दिया। यह पाठकों को सामाजिक कार्य और अनुसंधान के लिए प्रेरित करता है।

Web Title : Interview: 'Carver' still inspires people, gives something to society!

Web Summary : Veena Gavankar discusses the enduring impact of 'Ek Hota Carver,' emphasizing its inspirational value, promotion of self-reliance, and relevance to today's youth. It motivates readers toward social work and research.