Chloe Kelly Wild Celebration: महिला फुटबॉलपटूचं मैदानावर अजब सेलिब्रेशन; ८७००० चाहत्यांसमोर काढला टी-शर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:49 PM2022-08-03T16:49:07+5:302022-08-03T16:58:29+5:30

Chloe Kelly Removed her Jersey: निर्णायक गोल मारल्यावर महिला फुटबॉलपटूचा आनंद गगनात मावेनासा झाला...

Chloe Kelly Wild Celebration: फुटबॉल खेळातील खेळाडूंचा जोश पाहण्यासारखा असतो. कधी-कधी बडे फुटबॉलपटू गोल केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसतात. अनेक वेळा खेळाडू गोल मारल्यानंतर त्यांची जर्सीही काढतात. पण यावेळी चक्क इंग्लंडच्या एका महिला फुटबॉलपटूने असे काहीसे केले. त्यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसत आहे.

महिला युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि जर्मनीचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघ शेवटपर्यंत १-१ अशा बरोबरीत खेळले. दोन्ही संघांनी तोडीस तोड प्रत्युत्तर देत फायनलमधील रोमांच कायम ठेवला होते. मात्र अतिरिक्त वेळेत (Sudden Death) इंग्लंडने गोल करत सामना जिंकला आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

इंग्लंडच्या संघाकडून अतिरिक्त वेळेत क्लो केली या फुटबॉलपटूने निर्णायक गोल केला. त्यामुळेच इंग्लंड महिला फुटबॉल संघाला युरो कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. पण या विजेतेपदापेक्षाही जास्त चर्चा रंगली तरी केलीने गोल केल्यानंतर केलेल्या कृतीची. कारण केलीने गोल करत विजय मिळवून देताच लगेच मैदानावरील हजारो प्रेक्षकांसमोर आपला टी-शर्ट काढला.

युरो कप ही फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचा हा अंतिम सामना खेळला जात होता. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी गर्दीदेखील त्याच प्रकारची होती. इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील फुटबॉलची फायनल पाहण्यासाठी तब्बल ८७ हजार प्रेक्षक मैदानात होते.

युरो कप फायनलला ८७ हजार लोक स्टेडियममध्ये असताना अशा प्रकारे इंग्लंडची क्लो केली हिने केलेली कृती सध्या थोडी जास्तच चर्चेत आहे. सहसा पुरुष फुटबॉलपटू अशा प्रकारे जर्सी काढून विजय सेलिब्रेट करतात. परंतु केलीने अशी कृती केल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आल्याची चिन्ह आहेत.

महिला फुटबॉल सामन्यात आनंद साजरा करण्यासाठी जर्सी काढून सेलिब्रेशन करणारी केली ही पहिली महिला फुटबॉलपटू नाही. तिच्या आधी अमेरिकेच्या ब्रॅडी चॅस्टेन हिनेही अशाच प्रकारचं सेलिब्रेशन केलं होतं. १९९९ च्या फुटबॉल विश्वचषकाची फायनल मॅच होती. ती मॅच जिंकल्यानंतर साऱ्यांचाच आनंद गगनात मावत नव्हता. अशावेळी तिने साऱ्या प्रेक्षकांसमोर जर्सी काढून तशाप्रकारचा आनंद साजरा केला होता.