"आम्ही तर तिचे लग्न ठरवतोय, दोन स्थळांशी..."; सुंदर साध्वी हर्षा रिछारियाच्या वडिलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:45 IST2025-01-16T18:41:04+5:302025-01-16T18:45:20+5:30

Harsha Richhariya Marriage Update: महाकुंभामध्ये जगातील सुंदर साध्वी म्हणून ज्या तरुणीचे फोटो व्हायरल झाले होते, ती कोणी साध्वी नसल्याचे समोर आले आहे.

महाकुंभामध्ये जगातील सुंदर साध्वी म्हणून ज्या तरुणीचे फोटो व्हायरल झाले होते, ती कोणी साध्वी नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला ती देखील आपण साध्वी असल्याचे सांगत होती. परंतू, प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून तिने सारवासारव करण्यास सुरुवात केली होती. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची शिष्या असल्याचे सांगणाऱ्या हर्षा रिछारिया लग्नबंधनात अडकणार आहे.

हर्षाच्या वडिलांनीच ही माहिती दिली आहे. साध्वीच्या रुपातील व्हिडीओ हर्षाने टाकले होते. यामुळे तिची चर्चा सुरु झाली होती. संसारातील सर्व सुखे घेऊन ही साध्वी कशी काय म्हणवते म्हणून नेटकरी खवळले होते. अनेकांनी तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करत ही साध्वी कशी काय असा सवाल केला होता. अनेकांनी हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले होते.

या प्रतिक्रियांनंतर हर्षाने आपण साध्वी नसून अद्याप तिथपर्यंत पोहोचली नसल्याचे म्हटले होते. आता तर तिच्या वडिलांनी हर्षाचे लग्न ठरवत असल्याचे सांगितल्याने हर्षाच्या साध्वी होण्याच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

झाशी येथील रहिवासी हर्षा रिछारिया हिचे पालक भोपाळमध्ये राहतात. वडील दिनेश रिछारिया खाजगी नोकरी करतात आणि आई किरण या एक बुटीक चालवतात. हर्षाने बीबीए आणि अँकरिंगचा कोर्स केला आहे. २००४ मध्ये त्यांचे कुटुंब उज्जैन महाकुंभाला भेट देण्यासाठी आले आणि नंतर भोपाळमध्ये स्थायिक झाले.

तीन वर्षांपूर्वी केदारनाथ यात्रेनंतर हर्षा अध्यात्माकडे झुकली. ती दोन वर्षांपासून ऋषिकेशमध्ये राहत आहे. तिने एक एनजीओ देखील सुरू केली आहे. पुढे काय करायचे ते हर्षा स्वतः ठरवेल, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. हर्षाचे कुटुंब मुलीला साध्वी टॅग लागल्याने नाराज आहेत.

माझ्या मुलीला क्लब, रस्त्यावर किंवा मॉलमध्ये तोकडे कपडे घातलेले कोणी पाहिलेले नाही. मीच तिचे कपडे तयार करते. लहान मुलींनी माझ्या मुलीकडून शिकले पाहिजे. ती तरुणांमध्ये सनातनचा चेहरा असेल, असे तिच्या आईने सांगितले आहे.

तर मुलीच्या लग्नाची तयारी करत आहोत. तिच्यासाठी मुलगा शोधत आहोत. दोन ठिकाणी नात्याबद्दल चर्चा सुरू आहे, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.