पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:41 IST2025-08-01T13:35:32+5:302025-08-01T13:41:02+5:30

नुकतेच उत्तराखंड येथे पंचायत निवडणुका पार पडल्या. या वेळच्या निवडणुकीत काही वेगळाच नजारा होता. इंटरनेटवर चमकणारे आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारे युवा जेव्हा प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरले तेव्हा त्यांना त्यांचे खरे मूल्य कळले.

इंटरनेटच्या जगतात ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे लाखोने फॉलोअर्स असतात. त्यांच्या व्हिडिओना हजारोने व्ह्यूज मिळतात त्यांना उत्तराखंडच्या पंचायत निवडणुकीत पडलेली किरकोळ मते चर्चेचा विषय बनली आहेत. कुणाला ५५ तर कुणाला २६९ मतांवरच समाधान मानावे लागले आहे.

दीप्ती बिश्त या कनालीचीना ब्लॉकच्या डुंगरी ग्रामपंचायतीमधून प्रधानपदाच्या उमेदवार होत्या. युट्यूबवर त्यांना दीड लाख सब्सक्राईबर्स आहेत आणि फेसबुकवर एक लाखाहून अधिक जास्त फॉलोअर्स आहेत. परंतु जेव्हा बॅलेट बॉक्स उघडले तेव्हा त्यांचा सोशल मीडियावरील आभासी लोकप्रियतेचा गड ढासळला. त्यांना केवळ ५५ मते पडली.

रुद्रप्रयागच्या घिमतोली गावातील दीपा नेगी यादेखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. त्यांना युट्यूबवर १.२८ लाख सब्सक्राईबर्स आहेत. सोशल मीडियावर त्या कायम सक्रीय असतात. परंतु निवडणुकीत त्यांना २६९ मते मिळाली. त्यांच्या विरोधी उमेदवारांकडून त्या ४८० मतांनी हरल्या.

दीपा नेगी यांना पराभवानंतर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी म्हटलं की, मी पराभूत झाली असली तरी माझा आत्मसन्मान गमावला नाही. माझ्यासोबत खूप चुकीचे झाले, इतकेच नाही तर माझ्या पती आणि मुलांनाही टार्गेट करण्यात आले असं त्यांनी सांगितले.

मी फक्त १८० मतांनी हरले आहे. निवडणुकीत दोघांपैकी एक जिंकणार हे निश्चित होते. पराभवाने मला दु:ख नाही परंतु ज्या लोकांनी पैसे वाटले, मते खरेदी केली ते वाईट वाटते. मला ज्या लोकांनी मत दिले त्यांचे मी आभार मानते असंही दीपा नेगी यांनी म्हटलं.

हल्दानी इथल्या बच्चीनगर येथील भीम सिंह हेही निवडणूक लढवत होते. युट्यूबवर त्यांचे २१ हजार सब्सक्राईबर्स आहेत. फेसबुकवर २४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु निवडणुकीत त्यांना ९५५ मते पडली तर इथे विरोधी उमेदवाराने १५३४ मतांनी विजय मिळवला.

दरम्यान, उत्तराखंड पंचायत निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निकालात कुठल्याही एका पक्षाला एकतर्फी बहुमत मिळताना दिसले नाही. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. परंतु निवडणूक अत्यंत रंजक झाल्याचे दिसून आले.

या निवडणुकीत कुणी टॉस उडवून जिंकले तर कुणी चिठ्ठी काढून विजय मिळवला. या निवडणुकीत जावा-जावा आणि पती-पत्नी जोडीनेही चमत्कार केले आहेत. काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवल्याने दोन्ही कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला.

उत्तराखंडच्या बागेश्वर इथं गढखेत पंचायत निवडणुकीत लक्ष्मण कुमार उर्फ लच्छू पहाडीने निवडणुकीत विजय मिळवला आहे. लक्ष्मण हा दिव्यांग आहे. निवडणुकीत विजय मिळवणारा तो सर्वात छोट्या उंचीचा उमेदवार आहे. घोड्यावर स्वार होऊन लक्ष्मण निवडणुकीत प्रचार करत असल्याने तो चर्चेत आला होता.