उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये होऊ शकतात मोठे बदल; ...तर योगींची लॉटरी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:30 PM2021-11-09T20:30:45+5:302021-11-09T20:47:18+5:30

UP assembly elections 2022 : यूपी निवडणूक निकालाचा परिणाम एकीकडे देशाच्या राजकारणावर तर दिसेलच, पण दुसरीकडे भाजपमध्येही अनेक मोठे राजकीय बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांसह उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नुकत्याच लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. मात्र, यूपी निवडणुकीचे निकाल याहूनही अधिक दूरगामी असतील.

यूपी निवडणूक (UP assembly elections) निकालाचा परिणाम एकीकडे देशाच्या राजकारणावर तर दिसेलच, पण दुसरीकडे भाजपमध्येही अनेक मोठे राजकीय बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पक्षाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही याचे संकेत मिळाले आहेत.

या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एक राजकीय प्रस्ताव मांडला होता. असा प्रस्ताव सहसा राष्ट्रीय पातळीवरील नेतेच मांडत आले आहेत. त्यांनी मांडलेल्या या प्रस्तावाकडे, त्यांच्या पक्षातील वाढत्या उंचीच्या दृष्टीने पाहिले गेले. यामागचे एक कारण म्हणजे, बैठकीत निवडणुका होणाऱ्या राज्यांतून आलेले ते एकमेव मुख्यमंत्री होते. इतर सर्व जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यासंदर्भात विचारले असता, सीएम योगी हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे प्रमुख असून मुख्यमंत्री म्हणून त्यांचे रेकॉर्डही चांगले राहिले असल्याचे त्यांनी म्हटले होते.

स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथांची मागणी वाढली - गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांची उंची वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप सरकार असलेल्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत योगी देशभरात अधिक लोकप्रिय असल्याचे दिसते. एवढेच नाही, तर बंगालपासून ते आसामपर्यंतच्या निवडणुकांमध्येही त्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलावण्यात आले होते.

हैदराबादमधील नगरपालिका निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक म्हणून बोलावण्यात आले होते. यामुळे त्यांची लोकप्रियता यूपीबाहेरही दिसून आली आहे. अशा स्थितीत, त्यांनी त्यांच्या नेतृत्वात भाजपला यूपीमध्ये विजय मिळवून दिल्यास त्यांची राजकीय उंची आणि महत्व प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल. एवढेच नाही, तर भाजपमधील पर्यायी नेतृत्वाच्या दृष्टीनेही ते एक मोठा चेहरा होऊ शकतील.

मोदी-योगी-जयश्री राम सारख्याच घोषणा - गेल्या अनेक महिन्यांपासून यूपीमध्ये मोदी, योगी आणि जय श्री राम, सारख्या घोषणाच एकायला येत आहेत. मोदींसोबतच योगींचे नावही घेतले जात आहे. यावरूनच जनतेतील योगींची स्वीकारार्हता दिसून येते. एवढेच नाही, तर मोदींनंतर भाजपच्या पर्यायी नेतृत्वाची चर्चा करताना अनेकदा लोक योगींचे नावही घेताना दिसतात. यामुळे, यूपीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची बनली आहे आणि येथील विजय योगी आदित्यनाथ यांची पक्षातील उंची अथवा महत्व आणखी वाढवेल.

निवडणुकीनंतर समजेल योगींच्या छबीचा चमत्कार - भाजपने 2017 ची यूपी विधानसभा निवडणूक कुठल्याही चेहऱ्या शिवाय लढवली होती. यानंतर योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. भाजपच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केले गेले होते. यानंतर, गोरखपूरचे खासदार असलेले योगी विधान परिषदेच्या मार्गाने मुख्यमंत्री झाले होते.

...तेव्हा विधानसभा निवडणूक न लढवता योगी मुख्यमंत्री तर झाले, पण त्यांच्या नावावर निवडणूक लढविण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे 2022 ची विधानसभा निवडणूक भाजप शिवाय सीएम योगींच्या करियरचाही निर्णय करेल.