नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 01:50 PM2024-05-26T13:50:04+5:302024-05-26T13:56:41+5:30

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

Nashik News 26 crore cash found in Surana jewelers property worth 90 crore also seized | नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर

नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर

Surana jewelers :नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली. अज्ञात व्यवहारांच्या आरोपांनंतर छाप्यांमध्ये सुमारे २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून या सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाकडून तपास सुरु होता. शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता मिळाल्याने इतर सराफा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आयकर विभागाने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या सुराणा ज्वेलर्सवर मालकाने केलेल्या कथित अज्ञात व्यवहाराच्या तपासासाठी गुरुवारी मोठा छापा टाकला होता. शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईत ज्वेलर्स मालकाचे निवासस्थान आणि महालक्ष्मी बिल्डर्स या त्याच्या बांधकाम कंपनीचाही समावेश करण्यात आला. गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या कारवाईत आयकर विभागाने एकाच वेळी दागिन्यांच्या दुकानावर आणि मालकाच्या घरी छापे टाकले. अधिकाऱ्यांचे पथक दिवसभरात आर्थिक नोंदी, व्यवहाराचा डेटा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने छाननी करत होतं.

या छाप्यामुळे व्यापारी समुदायात खळबळ उडाली होती. अनेकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं होतं. तीन दिवसांच्या तपासानंतर या आयकर विभागाने २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर विभागाच्या जवळपास ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि महालक्ष्मी रिअल इस्टेटच्या कार्यालयात छापा टाकला होता. तसेच मालकाच्या राका कॉलनी इथल्या आलिशान बंगल्यातही आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.

सुमारे ३० तास ही कारवाई सुरू होती. अधिकाऱ्यांनी कारवाई दरम्यान लपवलेली रोख रक्कम बाहेर काढण्यासाठी मालकाच्या बंगल्यातील फर्निचर तोडले. या छाप्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याचबरोबर मनमाड शहरात आणि मालेगाव येथील एका व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. दरम्यान, आयकर विभागाने अलिकडच्या काही महिन्यांत राज्यभर छापे टाकून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती उघड केली आहे.
 

Web Title: Nashik News 26 crore cash found in Surana jewelers property worth 90 crore also seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.