आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 01:23 PM2024-05-26T13:23:02+5:302024-05-26T13:24:13+5:30

BJP Sudhir Mungantiwar Replied Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. मात्र, इंडिया आघाडीतील कोणी उद्धव ठाकरेंना बोलावले का, अशी विचारणा करत भाजपा नेत्यांनी पलटवार केला.

bjp sudhir mungantiwar replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

BJP Sudhir Mungantiwar Replied Sanjay Raut: ४ जूननंतर भाजपात मोदी-शाह यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपूरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसतात, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यानंतर आता संजय राऊतांवर भाजपाकडून पलटवार केला जात आहे. काँग्रेसनेही संजय राऊतांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

संजय राऊतांच्या दाव्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणे लावायचा धंदा दिलाय का? तुमचे नेमके काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधाने करत असेल तर काँग्रेसने त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये, अशा शब्दात नागपूरचे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला. यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.

खोटे बोलण्याची सवय आता व्यसनात बदलली आहे

खरे तर खोटे बोलण्याचीही एक मर्यादा असते. दुर्दैवाने ही सवय आता, व्यसनामध्ये बदलली आहे. रोज उठायचे खोटे बोलायचे. आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून जेवढा झाला. हे जेवढे खरे असेल, तेवढेच हे सत्य आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला, हे जेवढे खरे असेल, तेवढेच हे खरे आहे, असा खोचक टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसेच नितीन गडकरी हे देशात सर्वमान्य नेते आहेत. नितीन गडकरींनी प्रस्ताव मांडल्यावर सर्व खासदारांनी त्यांचे कौतुक केले. नितीन गडकरी यांच्या पाठीशी पंतप्रधान मोदी आहेत, म्हणूनच नितीन गडकरी हे करू शकतात. नितीन गडकरी यांच्या पाठीशी अमित शाह आहेत, म्हणूनच नितीन गडकरी हे करू शकतात. संजय राऊतांनी केलेला आरोप पूर्णपणे निराधार आहे. एकदा टीव्हीवर दिसायची सवय लागली. वर्तमानपत्रात रोज फोटो किंवा बातमी यावी, हे व्यसन जडले, तर हे आरोप होत असतात. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

दरम्यान, राज्यातील प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना बोलावले. मात्र, इंडिया आघाडीतील कोणत्या नेत्याने उद्धव ठाकरेंना देशात प्रचार करण्यासाठी बोलावले का, उद्धव ठाकरेंनी या आयुष्यात मोठी चूक केली आहे. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंचा पुढचा जन्म होईल, तेव्हा अशी चूक त्यांच्याकडून होऊ नये, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
 

Web Title: bjp sudhir mungantiwar replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.