"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 07:07 PM2024-05-25T19:07:30+5:302024-05-25T19:08:36+5:30

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

"I called Uddhav Thackeray on my way to Guwahati, but...", Bachchu Kadu explodes. | "मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

अमरावती : राज्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. राज्यात मतदानानंतर प्रचाराचा धुराळा शांत झाला आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता. पण, तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला. राजकारणात काहीही घडू शकतं. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

या निवडणुकीत आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, भाऊ नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्याविरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये, त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते, असे बच्चू कडू म्हणाले.

याचबरोबर, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद शमताना दिसत आहे. रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील, असेही विधान बच्चू कडू यांनी केले आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत आम्ही पाठिंबा दिलेला उमेदवारच निवडून येणार आहे. नवनीत राणा निवडून येणार नाहीत. टेक्निकल काय निकाल लागतो, ते माहीत नाही. सट्टा बाजारात कुणाचा काहीही भाव असला तरीही आम्ही ज्या प्रकारे आम्ही प्रचार केला त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. शेतकरी, मजूरवर्ग यांचे प्रश्न आम्ही मांडले आहेत. ही निवडणूक आम्ही जिंकलो आहे, आता ४ तारखेला चित्र स्पष्ट होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, जवळपास दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. शिवसेनेतल्या काही आमदारांसह त्यांनी सूरत गाठलं होतं. त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत बंड केलेल्या आमदारांसोबत बच्चू कडू सुद्धा होते.

Web Title: "I called Uddhav Thackeray on my way to Guwahati, but...", Bachchu Kadu explodes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.