भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:06 PM2024-05-26T15:06:56+5:302024-05-26T15:08:37+5:30

Amit Shah : छत्तीसगडचा एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे.

Naxal problem will be over in next 2-3 years, says Amit Shah | भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन

भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन

नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे नक्षलवादावर मोठे विधान समोर आले आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील नक्षलवादाची समस्या संपेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, छत्तीसगडचा एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे.

पशुपतीनाथ ते तिरुपती या तथाकथित नक्षल कॉरिडॉरमध्ये नक्षलवाद्यांची उपस्थिती नाही, असे अमित शाह म्हणाले. देशातून नक्षलवाद संपत आहे. कधीकाळी काही लोक पशुपतीनाथ ते तिरुपती या नक्षल कॉरिडॉरबद्दल बोलत असत. आता झारखंड पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. बिहार पूर्णपणे मुक्त झाला. ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

छत्तीसगड पूर्णपणे मुक्त झालेला नाही आणि तेथे काही भागात नक्षलवादी अजूनही सक्रिय आहेत. कारण गेल्या पाच वर्षांपासून राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. भाजपा सरकारने पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता हाती घेतल्यापासून छत्तीसगडला नक्षलमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. आमचे सरकार आल्यापासून (छत्तीसगडमध्ये) जवळपास १२५ नक्षलवादी मारले गेले आहेत, ३५२ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, १७५ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. आजची (२५ मे) आकडेवारीही मोजली तर जवळपास २५० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. इथे मी फक्त गेल्या पाच महिन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलत आहे असे म्हणत पुढील दोन किंवा तीन वर्षात देश नक्षल समस्येपासून मुक्त होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

दरम्यान, छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये नक्षलवाद्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. आतापर्यंतच्या इतिहासात एकाच चकमकीत मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ही सर्वाधिक संख्या होती.
 

Web Title: Naxal problem will be over in next 2-3 years, says Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.