मोठा धक्का! अमेरिकेनं भारताचं रेटिंग घटवलं; पाकिस्तान, सीरिया, इराकच्या रांगेत आणून बसवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:08 AM2020-08-26T11:08:26+5:302020-08-26T11:15:59+5:30

मैत्रीचे दावे करणाऱ्या अमेरिकनं भारताला मोठा धक्का दिला आहे. भारतात जाऊ नका, असा सल्ला अमेरिकनं आपल्या नागरिकांना दिला आहे.

कोरोनाचा वाढता कहर, गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात जाऊ नये, अशा सूचना ट्रम्प प्रशासनानं दिल्या आहेत.

अमेरिका आपल्या देशातील नागरिकांसाठी प्रवासाच्या दृष्टीनं योग्य असलेल्या देशांना रेटिंग देते. त्यात भारताला सर्वात खराब रेटिंग देण्यात आलं आहे.

अमेरिकेनं भारताला ४ रेटिंग दिलं आहे. युद्धग्रस्त सीरिया, दहशतवादाचं केंद्रस्थान असलेला पाकिस्तान, अस्थिरतेचा सामना करणारे इराण, इराक आणि येमेनलाही हेच रेटिंग दिलं गेलं आहे.

भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय अपराध आणि दहशतवाददेखील वाढत आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळेच नागरिकांनी भारतात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतात महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे, असंदेखील अमेरिकेनं नागरिकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी भारत सरकारनं अमेरिकन सरकारनं दबाव आणावा, अशी विनंती भारतीय पर्यटन आणि आदरातिथ्य संघानं (फेथ) केली आहे.

भारत सरकारनं तातडीनं यामध्ये लक्ष घालावं आणि देशाची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ देऊ नये, असं फेथनं म्हटलं आहे.

आधीच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय संकटात आहे. भारतात पुन्हा एकदा पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अमेरिकन सरकारच्या नियमावलीमुळे त्याला धक्का बसू शकतो, असं फेथनं भारत सरकारला सांगितलं आहे.

अमेरिकनं २३ ऑगस्टला नागरिकांसाठी नियमावली जारी केली. त्यात भारताचा समावेश थेट पाकिस्तान, सीरिया, येमेन, इराण आणि इराकच्या गटात करण्यात आला. हा भारतासाठी मोठा झटका मानला जात आहे.