Punjab Ajnala: विहिरीत सापडलेल्या 160 वर्षे जुन्या सांगाड्यांचे रहस्य उलगडले, धक्कादायक माहिती आली समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:05 PM2022-04-29T16:05:42+5:302022-04-29T16:21:20+5:30

Punjab Ajnala Human Skeletons: 2014 मध्ये पंजाबच्या अजनालातील एका विहिरीत सूमारे 250 मानवी सांगाडे सापडले होते. हे सांगाडे भारतीय सैनिकांचे असून, त्यांना इंग्रजांनी मारल्याची माहिती समोर आली आहे. वाचा 160 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं...?

Ajnala Human Skeletons: आपल्याला ब्रिटीशांनी केलेला जालीयनवाला बाग हत्याकांड माहिती आहे. तशाच एका हत्याकांडाचा खुलासा आता झाला आहे. 2014 मध्ये पंजाबच्या अजनाला (Ajnala) मध्ये एका विहिरीत मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे(Human Skeletons) आढळून आले होते. त्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्या सांगाड्यांचे रहस्य आता उलगडले आहे.

सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) च्या शास्त्रज्ञांनी पंजाब विद्यापीठ, बीरबल साहनी संस्था आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या शोधकर्त्यांसोबत केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 160 वर्षांपूर्वी पंजाबच्या अजनालामध्ये मोठा नरसंहार झाला होता. इंग्रजांनी भारतीय सैनिकांना मारुन विहीरीत फेकून दिले होते, त्यांचेच हे सांगाडे आहेत.

शास्त्रज्ञांनी अजनालाच्या जुन्या विहिरीतून निघालेल्या सांगाड्यांचे डीएनए आणि आयसोटोप अॅनालिसिसनंतर या नरसंहाराची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, हे 160 वर्षे जुने सांगाडे गंगा किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे आहेत. अनेक इतिहासकार मानतात की, हे सांगाडे भारत-पाकिस्‍तान फाळणीदरम्यान मृत्यू झालेल्या लोकांचे आहेत.

पण, काही ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये हे सांगाडे 1857 मध्ये ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या शहीद भारतीय सैनिकांचे असल्याचा उल्लेख आहे. वैज्ञानिक पुराव्याच्या अभावामुळे, या सैनिकांची ओळख आणि भौगोलिक उत्पत्ती यावर बराच काळ वाद झाला होता, परंतु आता सर्व काही स्पष्ट झाले आहे.

या सांगाड्यांची वास्तविकता पडताळून पाहण्यासाठी पंजाब विद्यापीठाचे डॉ. जे. एस. सेहरावत आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबाद, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट, लखनौ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांच्या शास्त्रज्ञांनी डीएनए आणि आयसोटोप अभ्यास केला.

या अभ्यासात, हाडे, कवटी आणि दातांच्या डीएनए चाचण्यांमुळे मृत्यू झालेले सर्व उत्तर भारतीय वंशाचे असल्याची पुष्टी झाली आहे. संशोधनात, डीएनएसाठी 50 नमुने आणि आयसोटोप विश्लेषणासाठी 85 नमुने वापरण्यात आले. डीएनए विश्लेषणामुळे लोकांचे अनुवांशिक संबंध समजण्यास मदत होते आणि समस्थानिक विश्लेषणामुळे अन्नाच्या सवयींवर प्रकाश पडतो.

विहिरीत सापडलेले मानवी सांगाडे हे पंजाब किंवा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांचे नसून, यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमधील डीएनएशी मिळते-जुळत असल्याचे या दोन्ही पद्धतींमधून समोर आले. सीसीएमबीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. के. थंगराज म्हणाले की, संशोधनाचे परिणाम पुराव्यावर आधारित इतिहास प्रस्थापित करण्यास मदत करतात.

ऐतिहासिक पुराणकथांच्या तपासात डीएनए आधारित तंत्रज्ञानाची उपयुक्तताही या अभ्यासातून दिसून येते. तर, संशोधनाचे पहिले लेखक डॉ. जे.एस. सेहरावत म्हणाले की, संशोधनाचे परिणाम ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत आहेत. तत्कालीन 26व्या नेटिव्ह बंगाल इन्फंट्री बटालियनमध्ये बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पूर्व भागातील लोकांचा समावेश होता.

ऐतिहासिक नोंदीनुसार, ही बटालियन मियां-मीर, पाकिस्तान येथे तैनात होती. ब्रिटिशांविरोधात बंड केल्यामुळे त्यांनी या बटालियनमधील सैनिकांना ठार केले होते. ब्रिटिश सैन्याने त्यांना अजनालाजवळ पकडले आणि त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकले होते. इतके वर्षे लोटली तरीदेखील या सांगाड्यांचे अवशेष चांगल्या स्थितीत सापडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

टीमचे प्रमुख संशोधक आणि प्राचीन डीएनए तज्ञ डॉ. नीरज राय म्हणाले की, टीमने केलेले वैज्ञानिक संशोधन इतिहासाकडे अधिक पुराव्यावर आधारित पद्धतीने पाहण्यास मदत करते. BHU च्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि DNA अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्ञानेश्वर चौबे म्हणाले की, या अभ्यासातून भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील गायब झालेल्या नायकांच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला जाईल.