"सासऱ्यांनी गच्चीवरून खाली फेकलं, 17 वर्षे अंथरुणाला खिळली"; आता 'ती' झाली रोल मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:07 PM2023-05-02T13:07:16+5:302023-05-02T13:22:57+5:30

पूनम 17 वर्षे अंथरुणाला खिळलेली होती. डॉक्टरांनीही तिच्या उठण्याची आशा सोडली होती.

पूनम राय यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा डॉक्टरांनी सांगितली होतं की ती कधीही तिच्या पायावर उभी राहू शकणार नाही. मुलीच्या जन्मानंतर सासरच्यांनी तिला छतावरून खाली फेकले. त्यामुळे मणक्याला दुखापत झाली अंथरुणातून उठणे तिच्यासाठी जवळजवळ अशक्य होते.

पूनम 17 वर्षे अंथरुणाला खिळलेली होती. डॉक्टरांनीही तिच्या उठण्याची आशा सोडली होती. पण, पूनमने तसे केले नाही. उभे राहण्याच्या जिद्दीने तिने डॉक्टरांना चुकीचे सिद्ध केले. ती केवळ उभी राहिली नाही तर पंखांवर उडून तिचे धैर्य दाखवलं. चित्रकलेचे सौंदर्य देशभर पसरवलं.

आज पूनम राय चित्रकार, तायक्वांडो खेळाडू आणि डान्सरसाठी आदर्श आहे. पूनमने पोर्ट्रेट बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील भेट दिलं आहे. बनारसमध्ये पंतप्रधानांनी पूनमची भेट घेतली आणि तिचे खूप कौतुक केले. बनारसमध्येच नाही तर ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

पूनम राय मूळची बिहारची आहे. 1983 मध्ये कुटुंब बनारसला स्थलांतरित झाले. वडील बिंदेश्वर राय हे अभियंता होते. राय यांची पोस्टिंग काशीला होती. घरातून पूनमला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली होती. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मधून चित्रकलेत पदवी घेतल्यानंतर तिचे लग्न पाटणा येथील एका मुलाशी झाले.

मुलगा अभियंता असल्याचे तिच्या कुटुंबीयांना खोटे सांगण्यात आले. वास्तविक तो फक्त इंटरमिजिएट पास होता. पूनमला सासरच्या घरी मोलकरीण बनवण्यात आलं. हुंड्यासाठी दररोज छळ केला जात होता. नोव्हेंबर 1997 मध्ये मुलगी झाली. मुलगी जन्माला आल्याने सासरचे लोक चांगलेच संतापले.

पूनम सांगते की, एके दिवशी ती काही कामानिमित्त गच्चीवर गेली असता, सासरच्यांनी तिला मागून ढकललं. ती खाली पडली त्यामुळे मणक्याला दुखापत झाली.तिला पुन्हा चालता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. ती 17 वर्षे अंथरुणाला खिळलेली होती.

2014 मध्ये तिला कृत्रिम आधार घेऊन चालता आले. त्यामागचे कारण होते उभे राहण्याची जिद्द. ती तिच्या पायावर उभी राहिली त्याच वर्षी तिचे वडील बिंदेश्वर यांचे निधन झाले. वडील तिची मोठी ताकद होते. वडिलांच्या स्मरणार्थ तिने बीआर फाउंडेशनची पायाभरणी केली.

पूनमने मुलांना चित्रकला शिकवायला सुरुवात केली. चित्रांची प्रदर्शनेही भरू लागली. ती 'सुबाह-ए-बनारस'चा एक भाग बनली. त्यामुळे बाहेरील लोकांशी त्यांचा संपर्क वाढला. आपल्यासोबत जे घडलं ते दुसऱ्या मुलीसोबत होऊ नये, अशी तिची इच्छा होती.

2017 मध्ये पूनमने 17 दिवस एकाच कॅनव्हासमध्ये रंग भरले. त्यात 648 फेस पेंटिंग्ज होत्या. या पेंटिंगमध्ये मुलीचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. यासाठी पूनमला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने पुरस्कार दिला.

पूनमने कॅनव्हासवर 648 वेगवेगळ्या मुद्रांमध्ये चेहरे कोरून महिलांचे दुःख आणि आनंद जगासमोर ठेवले. 28 फेब्रुवारी 2019 रोजी पूनमने बनारसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पूनमने तिला तिचे पोर्ट्रेट भेट दिले. त्यांच्या कलेचे पंतप्रधानांनी भरभरून कौतुक केले होते.

सर्व फोटो - सोशल मीडिया