'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:09 AM2024-05-16T10:09:15+5:302024-05-16T11:32:02+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या घाटकोपरमधील रोड शोवरुन शरद पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mumbai Loksabha Election Sharad Pawar criticizes PM Modi ghatkopar road show | 'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका

'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका

PM Modi Road Show : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी मुंबईतीलघाटकोपर परिसरात मोठा रोड शो केला. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या कडेला जमले होते. मात्र या रोड शोमुळे घाटकोपर मेट्रो स्टेशनवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मेट्रो प्रशासनाने जागृती नगर आणि घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा काही काळासाठी स्थगित केली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावरुन आता शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात ईशान्य मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक सिल्क मिल येथून सायंकाळी सातच्या सुमारास भाजप उमेदावारांसाठी पंतप्रधान मोदी यांनी रोड शो सुरू केला होता. विविध भागातून पुढे जात घाटकोपर (पूर्व) येथील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा रोड शो एका तास सुरु होता. मोदींच्या रोड शोमुळे, मेट्रो सेवा संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. यावेळात ऑफिसला जाणारे घरी परतण्यास सुरुवात करतात. मात्र सेवा बंद झाल्यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी ७.४६ वाजता सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. 

याबाबत बोलताना शरद पवार यांनी मोदींवर टीका करत त्यांचे एकाच वर्गावर लक्ष होतं असं म्हटलं आहे. "मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे काय शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागलं. ट्रॅफिक अतिशय भयंकर होतं. त्यांनी ज्या भागात कार्यक्रम घेतला तो गुजराती आहे. त्यांना रॅली करायची होती तर मुंबईमध्ये वसईसारखा भाग होता. पण त्यांचे लक्ष एकाच वर्गावर होतं. त्याचा लोकांना त्रास झाला आणि त्याच्या तक्रारी आल्या," असं शरद पवार यांनी म्हटलं.

मुंबईला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांचे निराकरण करायचे आहे - नरेंद्र मोदी

"उत्तम पायाभूत सुविधा आणि अधिक चांगल्या प्रकारचे 'सुलभ राहणीमान' या गोष्टी आमच्या मुंबईविषयीच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळेच या महानगरातल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू झाली आहेत, ज्यामुळे भारताच्या वृद्धीला लक्षणीय ऊर्जा मिळत आहे. गेल्या दशकात आम्ही केलेल्या कामाच्या आधारे आम्हाला या शहराला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांचे निराकरण करायचे आहे,  मग त्या स्वच्छताविषयक समस्या असोत, आरोग्य सुविधा अधिक प्रमाणात आवाक्यात आणणे. एनडीए ला मत म्हणजे सुधारणांना मत आहे आणि त्यामुळे भारताचे सर्वात आघाडीचे आर्थिक केंद्र ही मुंबईची ओळख आणखी भक्कम होईल. जगभरातील बँकर आणि गुंतवणूकदारांना मुंबईतून कोणत्याही अडचणीविना आपले व्यवहार करता येतील अशा प्रकारची मुंबई आम्हाला साकार करायची आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Web Title: Mumbai Loksabha Election Sharad Pawar criticizes PM Modi ghatkopar road show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.