प्रियंका गांधींच्या यशात भाजपाचाच फायदा; जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:40 PM2019-01-28T15:40:45+5:302019-01-28T15:48:38+5:30

गेली अनेक वर्षं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जी मागणी होत होती, ती श्रेष्ठींनी अखेर ऐकली आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागण्याआधीच त्यांनी 'आँधी' मानल्या जाणाऱ्या प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणात आणलंय. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून काँग्रेसनं 'मास्टरस्ट्रोक' लगावल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याचंही बोललं जातंय. परंतु, एबीपी आणि सी व्होटरने नुकत्याच केलेल्या जनमत चाचणीचा उत्तर प्रदेशातील निष्कर्ष पाहिला, तर प्रियंका गांधींना जास्तीत जास्त यश मिळणं भाजपाच्याच पथ्यावर पडू शकतं, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी सर्वाधिक ५१ जागा समाजवादी-बसपा यांच्या आघाडीला मिळतील, असा एबीपी-सी व्होटर यांच्या जनमत चाचणीचा अंदाज आहे. २०१४च्या निवडणुकीत यूपीतील ७३ जागा जिंकणारी एनडीए यावेळी २५ जागांवर घसरेल, तर काँग्रेसप्रणित यूपीएला फक्त चार जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज आहे.

पूर्वांचलमध्ये - ज्या प्रदेशाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे देण्यात आलीय - तिथल्या २१ जागांपैकी १५ जागा सपा-बसपा आघाडीला, तर ६ जागा एनडीला मिळताना दिसताहेत. काँग्रेस तिथे भोपळाही फोडू शकणार नाही, असाच काहीसा मतदारांचा मूड आहे. अर्थात, हा सर्व्हे प्रियंका गांधींच्या 'एन्ट्री'आधी झालाय. त्यांच्या येण्याने हे चित्र पार बदलेल, असा विश्वास काँग्रेसला वाटतोय. त्यांचा हा विश्वास खरा ठरला, तर फटका आघाडीला - तेही खास करून बसपाला बसेल आणि फायदा भाजपाचा होईल, अशीच जास्त शक्यता आहे. कारण, काँग्रेसला मिळणारी मतं ही भाजपाची कमी आणि सपा-बसपाची जास्त असतील.

भाजपाचा मतदार भले त्यांना नावं ठेवेल, पण मतदान दुसऱ्या पक्षाला करत नाही, हे चित्र वर्षानुवर्षं राजकारणात पाहायला मिळतंय. याउलट, सपा, बसपा आणि काँग्रेसचा मतदार काही प्रमाणात सारखाच आहे. दलित, मुस्लिम मतांवर त्यांची भिस्त आहे. प्रियंका गांधींमुळे काही प्रमाणात उच्चवर्णीय, उच्चस्तरीय मतं काँग्रेसकडे वळतीलही, पण 'ग्राउंड लेव्हल'ला जास्त उलथापालथ होऊ शकते.

आत्ताच्या जनमत चाचणीनुसार, सपा-बसपा आघाडीला ४३.९ टक्के, एनडीएला ३९.६ टक्के आणि यूपीएला ११.९ टक्के मतं मिळताहेत. प्रियंका गांधींच्या करिश्म्याच्या जोरावर यूपीएचा मतांचा टक्का नक्कीच वाढेल. पण, सपा-बसपाच्या टक्क्याला धक्का लागला, तर मतविभाजनाच्या जोरावर एनडीएच्या जागा वाढतील. संपूर्ण उत्तर प्रदेशातच याचे पडसाद उमटल्यास भाजपाला अनेक प्रश्नांचं 'उत्तर' मिळू शकतं.

पूर्वांचलमध्ये वाराणसी, आझमगड, गोरखपूर आणि बलिया हे चार महत्त्वपूर्ण भाग येतात. वाराणसी हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढाईत भाजपा पूर्ण ताकदीने उतरेल, यात काहीच शंका नाही.

उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सगळेच विरोधी पक्ष एकत्र लढल्याने मतविभाजनाचा विषयच आला नव्हता. यावेळी काँग्रेस आणि सपा-बसपाची महाआघाडी झाली असती, तर भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असत्या. पण, तिथे त्यांना मोठा दिलासा मिळाला. आता प्रियंका यांच्या 'एन्ट्री'नंही भाजपासाठी 'घंटी' वाजलीय. पण ती धोक्याची ठरते की आनंदाची, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.