Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 23:25 IST2025-08-14T23:16:08+5:302025-08-14T23:25:20+5:30

Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल.

काही दिवसांपूर्वी जे धराली घडले, त्याची पुनरावृत्ती चशोटीमध्ये झाली. आभाळ फाटले अन् अख्खे गाव पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ऐन दुपारी लोक आपापल्या कामात व्यस्त असतानाच काळाने डंख मारला.

किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावाजवळ दुपारी १२.३० वाजता ढगफुटी झाली आणि काही क्षणातच गाव गाडले गेले. मचैल माता यात्रेसाठी असंख्य लोक इथे आलेले असतानाच ही घटना घडली.

पाणी आणि चिखलाचा प्रचंड मोठा लोंढा आला आणि गावातील घरे, भाविकांच्या गाड्या, टेंट, लंगर आणि यात्रेनिमित्त लागलेली दुकानांचा घास घेऊन गेला.

चशोटी किश्तवाड शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. मचैल माता मंदिर रस्त्यावर हे गाव आहे. या भागात १८१८ ते ३८८८ मीटर उंच असणारे डोंगर आहे. त्यावर बर्फ पसरलेला आहे, ज्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड वाढतो.

ही घटना घडल्यानंतर असंख्य लोक पाण्याचा प्रवाहात वाहून गेले. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जे वाचले त्यांच्या आक्रोशाने डोंगर दऱ्याही शहारल्या.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीन शोध आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, एसडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या.

मदतकार्य सुरू झाले. बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी श्वानांनाही आणण्यात आले असून, युद्ध पातळीवर हे कार्य हाती घेण्यात आले. अंधारपडेपर्यंत ५२ मृतदेह मिळाले असून, अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५० लोकांना वाचवण्यात यश आले असून, २०० पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सीआयएसएफच्या दोन जवानांचाही समावेश आहे.

ढगफुटीनंतरची चशोटीमधील जी दृश्ये समोर आली आहेत, ती काळीज पिळवटून टाकणारी आहेत. अनेक ठिकाणी मृतदेह बेवारस पडली आहेत.

बहुतांश ठिकाणी मृतदेह चिखलातून शोधून बाहेर काढण्यात आले. घरे जमीनदोस्त झाली आहेत. वाहने वाहून गेली आहेत, तर रस्तेही गुडूप झाले आहेत. ढगफुटीपूर्वी गजबजलेल्या चशोटीची अवस्थात स्मशानभूमीसारखी झालीये.