Petrol Pump: पेट्रोल पंपावर असा लावतात तुम्हाला चुना, फसवणूक टाळायची असेल तर जाणून घ्या ही ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:16 PM2023-02-16T13:16:16+5:302023-02-16T13:19:09+5:30

Petrol Pump: आज आम्ही तुम्हाला त्या चार टीप्स सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.

पेट्रोल पंपावर फसवणूक झाल्याच्या अनेक गोष्टी तुमच्या कानावर आल्या असतील. अनेकदा तुमच्यासोबतही असे झाले असेल. मात्र ते तुम्हाला कळलेही नसेल. आज आम्ही तुम्हाला त्या चार टीप्स सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.

सर्वप्रथम तुम्ही मीटरमध्ये रीडिंग झिरो आहे की नाही हे पाहा. त्याशिवाय जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल भरत असाल तेव्हा मीटरवर सतत लक्ष ठेवा. जर तुम्हाला गाडीत बसून मीटर योग्य पद्धतीने दिसत नसेल तर तुम्ही गाडीतून उतरा. त्याशिवाय तुम्ही फ्युएल नोजलवरही लक्ष ठेवल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल.

अनेकदा तुम्हाला भेसळीच्या माध्यमातून फसवले जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला असा काही संशय असेल तर तुम्ही फिल्टर पेपर टेस्ट करू शकता. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार सर्व पेट्रोल पंपांवर फिल्टर पेपरचा स्टॉक ठेवणे आवश्यक आहे. तसेच कुठल्याही ग्राहकाला अशी तपासणी करण्याचा अधिकार आहे. टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाकावे लागतील. जर मागे काहीही डाग न ठेवता पेट्रोल हवेत उडाले तर पेट्रोल शुद्ध आहे, हे तुम्ही समजू शकता. जर मागे काही डाग राहिले तर पेट्रोलमध्ये भेसळ आहे, हे समजून जा.

अनेकदा पेट्रोल पंपावर ग्राहकांना फसवण्यासाठी मशीनमध्येसुद्धा छेडछाड केली जाते. म्हणजेच रिडींग अधिकच्या पेट्रोलची येईल, मात्र तुमच्या गाडीमध्ये तेल कमी जाते. जर तुम्हाला असा संशय असेल तर तुम्ही पेट्रोल पंपवरील पाच लिटरच्या जारमध्ये तेल भरून तुमचा संशय दूर करू शकता. मात्र या जारमध्येही काही गडबड केलेला नाही ना, याचीही चाचपणी करून घ्या.

जर वर सांगितलेल्या कुठल्याही पद्धतीने तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही पेट्रोल पंप कंपनीकडे तक्रार करू शकता. त्यासाठी इंडियन ऑईलसाठी कस्टमर केअर क्रमांक १८००-२३३३-५५५ आहे. तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांसाठी कस्टमर केअर क्रमांक १८००२२४३४४ आहे. त्याशिवाय या कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर भेट देऊ शकता.