Omicron:...तर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; ओमायक्रॉनवरुन IMA चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 11:24 AM2021-12-08T11:24:02+5:302021-12-08T11:29:55+5:30

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळले आहेत. याचवेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची मागणी केली आहे.

त्याचसोबत IMA ने १२ ते १८ वर्षातील मुलांचेही लसीकरण वेगाने करण्याची मागणी केली आहे. IMA डॉक्टरांच्या टीमनं पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतातील अनेक राज्यात कोरोना व्हायरस व्हेरिएंटचे रुग्ण समोर येत आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मिळालेला डेटा आणि ज्या देशात पहिल्यांदा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला. त्याठिकाणच्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक संक्रमण करणारा असून जास्तीत जास्त लोकांना हा व्हेरिएंट विळख्यात घेऊ शकतो असं सांगितलं आहे.

भारतात कोरोना नियंत्रणात येत असताना ओमायक्रॉनचे रुग्ण आढळणं हा एका मोठा धक्का आहे. जर आपण हा व्हेरिएंट रोखण्यासाठी पर्यायी उपाय केले नाही तर तर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा धोकाही IMA ने दिला आहे.

आतापर्यंत लसीकरणामुळे हे सिद्ध झालंय की, हे संक्रमण गंभीर स्वरुपात जाण्यापासून रोखतं. जर लसीकरणावर आपण लक्ष दिलं तर निश्चितच भारत ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या परिणामापासून वाचू शकतो. त्यामुळे सध्या सर्वांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे.

गरजवंतांना लसीचे दुसरे डोस तात्काळ देण्यात यावेत. ओमायक्रॉन गंभीर संक्रमण पसरवत नसला तरी डेल्टाच्या तुलनेत तो १० पटीने अधिक लोकांना संक्रमिक करत आहे. सरकार आणि सर्व स्टेकहोल्डर्सनं लसीकरण वाढवून संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलायला हवीत असं IMA ने सांगितले आहे.

त्याचसोबत प्रवासावर निर्बंध लावण्याचं समर्थन आम्ही करत नाही. परंतु सर्वांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन IMA ने केले. विशेष म्हणजे पर्यटन, सामाजिक समारंभात जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टमनं कोविड प्रोटोकॉलचं सक्तीनं पालन करावं.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट पूर्णपणे पसरलेला आहे. त्याठिकाणी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची संख्या वाढली आहे. ते पाहता IMA ने सर्व शाळा, कॉलेज यांना कोविड प्रोटोकॉलच्या सक्तीचं पालन करण्यासाठी युवांना लसीकरण करण्याचं आवाहन केले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याबाबत राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की चौथी लाट आणि नव्या व्हेरिएंटचा अंदाज होताच. ओमायक्रॉनबाबत दक्षिण आफ्रिकेसोबत जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत

तरीही नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच लॉकडाऊनसारख्या कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे रामाफोसा म्हणाले.

Read in English