नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, अजित डोवालांवर जबाबदारी; भारताचा 'डबल' फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 12:03 PM2023-05-09T12:03:05+5:302023-05-09T12:06:50+5:30

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या सौदीच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी अमेरिकेचे जॅक सुलिव्हन यांच्यासह UAE आणि सौदी अरेबियाच्या टॉप लीडरशिपशी ते चर्चा करत आहेत. मोदी सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी डोवाल मध्य पूर्व क्षेत्रात काम करत आहेत.

भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बेल्ट अँड रोड(BRI) च्या माध्यमातून चीनच्या वाढत्या प्रभावावर अंकुश ठेवता येणार आहे. भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमीरात आणि सौदी पश्चिम आशियाई देशांना रेल्वे नेटवर्कने जोडण्याच्या मिशनवर हे देश काम करत आहेत.

हा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला असून त्यात भारताचा मोठा रोल आहे. भारताने रेल्वेमधील आपल्या कौशल्याचा वापर करावा असं अमेरिकेला वाटते. त्यामुळे भारताचा या प्रकल्पातून डबल फायदा होणार आहे. तसेच चीनचा दबदबा कमी करण्यासही मदत मिळणार आहे.

मध्य पूर्व भागात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले. भारताचा या प्रकल्पात फायदा आहे त्यामुळे भारतदेखील उत्सुक आहे. चीनच्या नेतृत्वात सौदी आणि इराणमध्ये करार झाला ज्यामुळे भारत अलर्ट झाला आहे. पश्चिम आशिया भाग भारताच्या ऊर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

जर हा रेल्वे मार्ग तयार झाला तर भारताला त्याचा थेट फायदा होईल. पश्चिम आशियात रेल्वे नेटवर्क पसरेल. या भागातून समुद्रमार्गे दक्षिण आशियालाही जोडण्याचा प्लॅन आहे. हे यशस्वी ठरले तर अत्यंत वेगाने कमी खर्चात भारतात तेल आणि गॅसचा पुरवठा केला जाऊ शकतो.

या रेल्वे नेटवर्कमुळे आखाती देशात राहणाऱ्या लाखो भारतीयांचा फायदा होऊ शकतो. जर भारत रेल्वेमधील त्याचे कौशल्य वापरून हा प्रकल्प मार्गी लावत असेल तर जगात रेल्वे बिल्डर म्हणून भारत जगात नावलौकिक मिळवेल असं तज्ज्ञांना वाटते.

भारत सरकार आणि खासगी कंपन्यांही पश्चिम आशियाई देशात नवीन संधीच्या शोधात आहेत. सीमेवर डोकेदुखी ठरलेल्या चीनच्या नापाक करतुतींना आळा घालण्यासाठी हा प्रकल्प भारताच्या हितात आहे. भारत थेट अरब आणि आखाती देशात रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून पोहचेल.

सध्या भारताला पश्चिम आशियाशी कनेक्टिविटीत पाकिस्तान अडथळा ठरत आहे. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध चांगले नाहीत. गिलगित-बलुचिस्तानवर पाकच्या अवैध कब्जामुळे भारताला रस्ते मार्गावरून अफगाणिस्तानहून पश्चिम आशियापर्यंत पोहचण्यास अवघड आहे.

भारत कच्च्या तेलाचा खूप मोठा ग्राहक आहे. त्यामुळे सौदी अरेबिया आणि यूएईलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होताना दिसत आहे. अमेरिका दक्षिण आशिया, पश्चिम आशियाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून आर्थिक आणि रणनीती या दोन्हीसाठी त्यांचा फायदा होणार आहे.

पुढील काही वर्षात सौदी, संयुक्त अरब अमीरात आणि दुसऱ्या आखाती देशांमध्ये भारताने बनवलेली ट्रेन धावताना दिसेल. हे रेल्वे नेटवर्क बंदरे, शिपिंग लेनद्वारेही भारताला जोडले जातील. अमेरिकेलाही आखाती देशांच्या माध्यमातून पश्चिम आशियापर्यंत पोहचायचे आहे.

२०१३ मध्ये चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यामाध्यमातून पाकिस्तान, अफगाणिस्तामार्गे पश्चिम आशिया आणि युरोपपर्यंत पोहचण्याची चीनची तयारी सुरू आहे. यात जगातील १५० देशांना रस्ते, ट्रेन आणि शिपिंग लेन यातून जोडण्याची योजना आहे. परंतु अनेक देशांनी चीनचे मनसुबे लक्षात घेऊन प्रकल्पातून काढता पाय घेतला.