ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !

By अतुल कुलकर्णी | Published: April 28, 2024 05:11 AM2024-04-28T05:11:28+5:302024-04-28T05:13:57+5:30

१५ मिनिटांत पोहोचणाऱ्या पैशांना लागत आहेत दोन ते तीन दिवस

Market money disappears in elections Angadia rates increased | ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !

ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !

अतुल कुलकर्णी 

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने देशभरात कारवाई करत ४,६५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या ७५ वर्षांत निवडणूक काळात इतकी मोठी रक्कम कधीही जप्त झाली नव्हती; मात्र या कृतीमुळे बाजारातील रोख पैसा गायब झाला आहे. विरोधकांकडे प्रचारासाठी रोख पैसा नाही, असे चित्र गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदा दिसत आहे. पैशांची ने-आण करणारी अंगडिया सेवा कधी नव्हे ती प्रचंड महाग झाली आहे.

अंगडिया हा मुळात गुजराती शब्द. किमती वस्तूंची सुरक्षित ने-आण करण्याचे काम करणाऱ्यांना अंगडिया म्हणतात. ३०-३५ वर्षांपूर्वी ही सेवा गुजरात व मुंबईतून सुरू झाली. मुंबईत भुलेश्वर, बीकेसी आणि मालाड या तीन ठिकाणांहून अंगडियाचे व्यवहार केले जातात. त्याशिवाय बडोदा, सुरत, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली, पुणे, जयपूर, भिलवाडा, पालनपूर, सिद्धपूर, मेहसाणा, वापी, नवासारी, भरूच, आणंद ही अंगडिया सेवेची प्रमुख ठिकाणे आहेत. या ठिकाणी वस्तू,  दागिने यांची ने-आण करण्याचे काम अंगडियामार्फत केले जाते. अंगडियाचे व्यवहार ज्या भागात चालतात तिथल्या पोलिस ठाण्यात पोस्टिंग मिळावी म्हणूनही प्रचंड प्रयत्न केले जातात.

मुंबईत अंगडियावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दहा लाख रुपये प्रति महिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्यात मुंबईत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त असताना सौरभ त्रिपाठी आणि तीन पोलिस अधिकाऱ्यांवर अंगडियाकडून पैसे घेतल्याचा आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना जानेवारीमध्ये पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले.

१५ मिनिटांत मनी ट्रान्सफर

■ मोठी रक्कम तुम्हाला पाठवायची झाल्यास ठराविक शुल्कासह ती अंगडिया दिल्यास, पुढच्या पंधरा मिनिटात तुमचे पैसे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये पोहोचवले जातात.
■ सुरक्षित पद्धतीने पैसे पाठविण्याचा मार्ग म्हणून ही यंत्रणा लोकप्रिय झाली. 

पाचपट शुल्क अन् तीन दिवसांचा वेळ

■ एका शहरातला पैसा दुसऱ्या शहरात पाठविण्यासाठी दहा लाख रुपयांमागे एक हजार रुपये फी घेतली जात होती. शुल्काची हीच रक्कम आता पाच पटीने वाढली आहे.
■ एवढेच नव्हे, तर दिलेली रक्कम दोन तासांत देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणारे अंगडिया आता तीच रक्कम पोहोचवण्यासाठी दोन ते तीन दिवस घेत असल्याची माहिती आहे.

■ लोकसभेचा निकाल लागेपर्यंत हीच परिस्थिती राहील, त्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

म्हणून बाजारात निर्माण झाली रोखेची टंचाई

लोकसभा निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोगाने एकट्या महाराष्ट्रात केवळ ४४ दिवसांत ४० कोटी रुपये जप्त करण्यात आले.

२ त्याशिवाय ६९.३८ कोटींचे मौल्यवान धातू, २८.४६ कोटींची ३५ लाख लिटर दारू, शिवाय ७९.८७ कोटींच्या अन्य वस्तू असा ४३१.३४ कोटी रुपयांचा मुद्देमाल निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आला होता.

त्यामुळे कोणीही रोख पैसे कुठेही पाठवायला तयार होत नाही. राजकारण्यांकडे पैसा नाही अशातला भाग नाही. पण ते स्वतःचा पैसा बाहेर काढायला तयार नाहीत. परिणामी बाजारात रोख पैशांची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: Market money disappears in elections Angadia rates increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.