Modi Govt 9 Years : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' 9 योजना, ज्यामुळे देशाचे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:33 PM2023-05-29T18:33:41+5:302023-05-29T18:40:32+5:30

Modi Govt 9 Years : 2014 पासून केंद्र सरकारने देशातील शेतकरी, महिला आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

PM Modi Govt 9 Years : केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून आले. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या 9 योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर झाला आहे.

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)- केंद्र सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) लॉन्च केली होती. या योजनेंतर्गत लोकांची बचत खाती शून्य रुपयांच्या ठेवीवर उघडली जातात. हे खाते तुम्ही कोणत्याही बँकेत फक्त आधार कार्डद्वारे उघडू शकता. या खात्यावर खातेदाराला एक लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)- पीएमजेजेबीवाय ही देखील केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. ही 9 मे 2015 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली होती. यामध्ये सरकारकडून दोन लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. यासाठी विमाधारकाला वर्षाला 436 रुपये भरावे लागतात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)- PMJJBY सोबत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) देखील सुरू करण्यात आली. यामध्ये 18 ते 70 वयोगटातील लोकांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची रक्कम दिली जाते. यासाठी वर्षाला 20 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

अटल पेन्शन योजना (APY)- असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळावी यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे प्रशासित केली जाते. यामध्ये केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच ही योजना घेऊ शकतात आणि या आधारे लोकांना 60 वर्षांनंतर किमान 1000 रुपये ते कमाल 5000 रुपये पेन्शन दिली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र सरकार 100 टक्के निधी देते. या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती.

पंतप्रधान उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana)- केंद्र सरकारने 2016 मध्ये देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशातील बीपीएल कुटुंबांना एलपीजी सिलिंडर आणि गॅस कनेक्शन अनुदानावर दिले जातात.

सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana)- सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेचा एक भाग आहे. या योजनेत 10 वर्षांपर्यंतच्या मुलींचे खाते उघडता येते. यावर 8 टक्के व्याज केंद्र सरकार देते. यामध्ये मुलगी 21 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा 18 वर्षांनी लग्न झाल्यावरच पैसे काढता येतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC)- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ची घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली. महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना खास सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त दोन लाख रुपये दोन वर्षांसाठी जमा करता येतील. यावर 7.5 टक्के व्याज दिले जाते.

आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana)-आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना केंद्र सरकारने दुर्बल घटकातील लोकांना चांगले उपचार देण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच दिले जाते.