Lok Sabha 2024: लोकसभेच्या 200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट लढत; इतर जागांबाबत विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिका...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 04:31 PM2023-05-18T16:31:24+5:302023-05-18T16:35:13+5:30

कर्नाटक निवडणुकीनंतर विरोदी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, पण काँग्रेससमोर एक मोठी अडचण असणार आहे.

Congress LokSabha: कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी सर्व विरोधीपक्ष एकत्र येत आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेसपासून अंतर राखणाऱ्या विरोधी पक्षांचे सूरही बदलू लागले आहेत. पण, काँग्रेसने त्याच 200 लोकसभा जागांवर लक्ष केंद्रित करावे, जिथे त्यांची थेट भाजपशी स्पर्धा आहे, अशी काही विरोधी पक्षांची इच्छा आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, त्या 200 जागा कोणत्या आहेत आणि तिथली राजकीय परिस्थिती काय आहे..?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जीपासून ते सपा प्रमुख अखिलेश यादव आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यापर्यंत, सर्व विरोधी पक्षांचे नेते 2024 ची लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत लढू इच्छितात, परंतु त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या एकजुटीच्या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मजबूत पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे. काँग्रेस जिथे मजबूत आहे तिथे लढू द्या. यात इतर कोणत्याही पक्षाला अडचण नाही.

काँग्रेस 200 जागांवर मजबूत असल्याचा आमचा अंदाज आहे. काही चांगले करायचे असेल, तर त्याग करावा लागतो. यूपीचा विचार केला तर, तिथे अखिलेश यांना (एसपी) प्राधान्य द्यावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी इतर राज्यांचेही उदाहरण दिले. बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, झारखंड, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये लोकांमध्ये मजबूत पकड असलेल्या पक्षांना प्राधान्य द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या. बिहारमध्ये नितीश, तेजस्वी आणि काँग्रेस एकत्र असतील तर ते निर्णय घेऊ शकतात.

काँग्रेस आणि भाजपमध्ये सर्वाधिक थेट लढत उत्तर भारतातील राज्यांमध्ये आहे. मध्य प्रदेश (29), कर्नाटक (28), राजस्थान (25), छत्तीसगड (11), आसाम (14), हरियाणा (11), हिमाचल (4), गुजरात (26), उत्तराखंड (5), गोवा (2) , अरुणाचल प्रदेश (2), मणिपूर (2), चंदीगड (1), अंदमान आणि निकोबार (1) आणि लडाख (1) मध्ये लोकसभेच्या जागा आहेत.

अशा प्रकारे लोकसभेच्या 162 जागा आहेत, जिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होणार आहे. तसेच, लोकसभेच्या 38 जागा अशा राज्यांच्या आहेत, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहेत, परंतु या जागांवर काँग्रेसशी लढत आहे. या यादीत पंजाबमध्ये 13 पैकी 4 जागा, महाराष्ट्राच्या 48 पैकी 14 जागा, यूपीमध्ये 80 पैकी 5, बिहारमध्ये 40 पैकी 4, तेलंगणामध्ये 17 पैकी 6 आणि आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये 5 जागा आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत या 200 जागांपैकी भाजपला 168 जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसला फक्त 25 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 7 जागा इतर पक्षांनी जिंकल्या. दुसरीकडे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील 200 जागांच्या निकालांवर नजर टाकली तर भाजपला 178 जागा जिंकण्यात यश आले. काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या. 6 जागा इतरांच्या खात्यात गेल्या.

कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांचे निवडणूक निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडले जातील. कर्नाटकानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या मतदानाच्या ट्रेंडचे मूल्यांकन केल्यास राज्यातील लोकसभेच्या 29 जागांपैकी केवळ भाजपला 4 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. या वर्षी होणार्‍या अन्य राज्यांच्या निवडणुकांमध्येही असाच ट्रेंड राहिला तर भाजपसाठी 2024 च्या निवडणुकीचा मार्ग कठीण होऊ शकतो.