'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 07:13 PM2024-05-13T19:13:51+5:302024-05-13T19:22:54+5:30

Lok Sabha Elections 2024 : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सत्येंद्र जैन, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक, पंकज गुप्ता, संजय सिंह आणि आतिशी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.

aap star campaigners list arvind kejriwal sunita kejriwal manish sisodia, Lok Sabha Elections 2024 | 'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

 नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP) पंजाब लोकसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव पहिले आहे. याचबरोबर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सत्येंद्र जैन, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक, पंकज गुप्ता, संजय सिंह आणि आतिशी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियाचे नावही या यादीत सामील आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या परनीत कौर आणि आम आदमी पार्टीचे कुलदीप सिंग धालीवाल यांच्यासह अनेक उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले. परनीत कौर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे बलबीर सिंग यांनी पटियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आम आदमी पार्टीचे कुलदीप सिंग धालीवाल यांनी अमृतसरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

भाजपाचे उमेदवार अरविंद खन्ना यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून, तर शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) उमेदवार विरसा सिंग वलटोहा यांनी तरनतारन जिल्ह्यातील खादूर साहिब मतदारसंघातून अर्ज दाखल केला. दरम्यान, १४ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १५ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ मे आहे. तर पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

परनीत कौर चार वेळा खासदार
उमेदवारी दाखल करताना चार वेळा खासदार राहिलेल्या परनीत कौर यांच्यासोबत त्यांचा मुलगा रणिंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर आणि भाजपा नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पतियाळा येथील ऐतिहासिक बुर्ज बाबा आला सिंह येथे नमन केले. मार्चमध्ये भाजपामध्ये सामील झालेल्या परनीत कौर यांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पटियाळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निलंबित केले होते. 

Web Title: aap star campaigners list arvind kejriwal sunita kejriwal manish sisodia, Lok Sabha Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.