CoronaVirus News : "सणासुदीच्या काळात सूट दिल्यास महिन्याला कोरोनाचे 26 लाख नवे रुग्ण आढळतील", तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 11:11 AM2020-10-19T11:11:38+5:302020-10-19T11:33:24+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे.

देशात कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 75,50,273 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,14,610 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 55,722 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 579 जणांचा मृत्यू झाला आहे. सण, समारंभांच्या काळात अधिक दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात याआधीही देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरससंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारच्या एका विशेष सरकारी समितीने इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात कोरोना संदर्भात सतर्कता न बाळगल्यास आणि सूट दिल्यास महिन्याला 26 लाख नवे कोरोना रूग्ण समोर येऊ शकतात असं म्हटलं आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे.

कोरोनामुळे देशातील फक्त 30 टक्के नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा आणि उत्सवांमध्ये कुठल्याही स्तरावरील निष्काळजी चिंता वाढवू शकते.

कोरोना संदर्भात जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे आणि मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले तर फेब्रुवारी 2021 पर्यंत या देशात कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल असं समितीने म्हटलं आहे.

हिवाळ्यातील थंडीची चाहूल आणि आगामी सणांचा हंगाम पाहता देशात कोरोना संसर्गाची नवी लाट येण्याचा धोका आहे. अशा स्थितीत कुठल्याही स्तरावर दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा अतिशय बिकट परिस्थिती उद्भवू शकते.

कोरोनासंदर्भात जारी केलेले सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावेत, अशी शिफारस समितीने सरकारला केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत.

येत्या फेब्रुवारीपर्यंत करोना संसर्ग नियंत्रणात आल्यास एकूण रूग्णांची संख्या जवळपास 1 कोटी 5 लाखांपर्यंत असेल. सध्या ही संख्या 75 लाखांच्या जवळ आहे असं समितीने म्हटलं आहे.

देशात लॉकडाऊन घोषित केला नसता तर ऑगस्टपर्यंत 25 लाख नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असता. सध्या ही संख्या 1 लाख 14 हजारांच्या जवळ आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन करावा, याचे समर्थन समितीने केलेले नाही. एखाद्या विशिष्ट भागात संसर्ग वाढल्यास लॉकडाऊनचा उपयोग करता येऊ शकतो, असं समितीने सुचवलं आहे.

सणांच्या काळात नागरिकांची गर्दी होते. केरळमध्ये 22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान ओणम सणानंतर संसर्गात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं होतं. संसर्ग होण्याची शक्यता 32 टक्क्यांनी वाढली आहे.

येत्या दोन महिन्यांत दसरा आणि दिवाळीसारखे सण येत आहेत. यामुळे कुठल्याची प्रकारची अधिक सूट देणं धोकादायक ठरू शकतं, असं समितीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्ताची संख्या ही 10.6 मिलियन अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही असं देखील समितीने म्हटलं आहे.

भारतात सध्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहचली आहे. व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत असा सल्लाही देण्यात आला आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीचं गठण करण्यात आलं होतं. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत.