CoronaVirus Updates: देशात नव्या ३८ हजार ७९२ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:32 PM2021-07-14T12:32:20+5:302021-07-14T13:36:03+5:30

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०१ लाख ०४ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या २४ तासांत ३८ हजार ७९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०९ लाख ४६ हजार ०७४ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख २९ हजार ९४६ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४१ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०१ लाख ०४ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात मंगळवारी दिवसभरात ७ हजार २४३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार ९७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ३८ हजार ७३४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्के झाले आहे.

राज्यात गुरुवारी १९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे. तब्बल ३३ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या १ लाख ४ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७४ हजार ४६३ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर ४ हजार ६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर दररोजची रुग्ण संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र मंगळवारी गेल्या पाच महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ४४१ बाधित आढळून आले आहेत, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ९२५ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख २८ हजार ६१५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख तीन हजार ६७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६४४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ९५० सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी चार रुग्णांना सहव्याधी होत्या.

गेल्या आठवड्यात ४५३ बाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यांनतर मंगळवारी पुन्हा रुग्णांचा आकडा कमी आहे. दिवसभरात ३० हजार १०० कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७५ लाख ९२ हजार ५०१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.