CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:35 AM2021-04-05T09:35:40+5:302021-04-05T09:44:32+5:30

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाःकार वाढत चालला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याचे म्हटले जात आहे.

कोरोनाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जोरदार प्रयत्न करीत आहेत. चाचण्यांसह लसीकरण वाढवण्यावर जोर दिला जात आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे.

रविवारी एकाच दिवसात कोरोनाचे ५७ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि मृतांच्या संख्येतही वाढ पहायला मिळत असल्याने केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. (coronavirus update)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोनाचा सर्वाधिक आकडा असलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली. यात अनेक वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. केंद्रीय पथके महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडचा दौरा करणार आहेत. या पथकांमध्ये आरोग्य तज्ज्ञ तसेच डॉक्टरांचा समावेश असेल.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: टाळेबंदीच लागू केली.

महाराष्ट्रात चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मनोरंजन केंद्रे, वॉटरपार्क , क्लब, तरण तलाव, व्यायामशाळा , क्रीडा संकुले ३० तारखेपर्यंत बंद ठेवली जातील. चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला काही अटींवर परवावनगी दिली जाणार आहे.

या तीन राज्यांसह उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाचा कहर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४ हजार १६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण रविवारी आढळून आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण वाढवण्यात आले आहे. योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरे कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जाणार आहेत. एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६० घरे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी दिल्लीत ४ हजार ०३३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि केरळसह १२ राज्यातील कोरोना संक्रमण वाढत आहे.

देशातील १४ राज्ये आणि ओडिशा, आसाम, पुदुच्चेरी, लडाख, दादरा आणि नगर हवेली, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, सिक्किम, लक्षद्वीप, मिझोराम, अंदमान और निकोबार तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

महाराष्ट्रासह पंजाबमध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कालावधीत पंजाबमध्ये ३.२ टक्के अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ६० टक्के कोरोना मृत्यू हे पंजाब आणि महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हरियाणामध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात केवळ १०० जणांना सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, अंत्यसंस्कारावेळी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजस्थानध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. नवीन गाइडलाइननुसार, रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. इयत्ता पहिली ते ९ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

गुजरातमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत गुजरातमध्ये २ हजार ८७५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आसाममध्येही कोरोना संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

देशातील कोरोना परिस्थिती अशीच कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील IISC वर्तवला आहे.