CoronaVirus : धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:17 PM2021-12-30T17:17:00+5:302021-12-30T17:28:05+5:30

Coronavirus Third Wave : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. देशात काल कोरोनाचे 13 हजार 154 नवे रुग्ण समोर आले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा तब्बल 43 टक्क्यांनी अधिक होता. तर दिल्लीत 923 आणि मुंबईत 2,510 कोरोनाबाधित समोर आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास ओमिक्रॉनला जबाबदार मानले जात आहे.

ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक वेगाने होतो. यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third Wave) धोकाही वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत सांगितले की, दिल्लीत समोर येणाऱ्या नव्या रुग्णांमध्ये 46 टक्के नवे रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. या पूर्वी ओमायक्रॉनचा संसर्ग केवळ परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्येच दिसत होता. मात्र, आता तो इतर लोकांमध्येही झाल्याचे दिसत आहे. यामुळे आता ओमिक्रॉनचे कम्युनिटी स्प्रेड व्हायला सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.

सत्येंद्र जैन म्हणाले, ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे, परंतु इतर प्रकारांच्या तुलनेत तो कमी गंभीर आहे. ते म्हणाले, काल ९२३ रुग्ण समोर आले, पण एकही मृत्यू झाला नाही. तसेच केवळ 200 लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. यांपैकी 115 रुग्ण असे आहेत ज्यांना खबरदारी म्हणून ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या अनुभवनुसार, समजते की ओमिक्रॉन व्हेरिअंट फारसा गंभीर नाही आणि त्याची लक्षणेही अतिशय सौम्य आहेत. दिल्ली, मुंबईसह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असेही आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

मुंबईतही तिसरी लाट, 80% रुग्ण ओमायक्रॉन बाधित! - दिल्लीसह मुंबईतही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. येथे काल 2,510 नव्या रुग्णांची नोंद झाली. याच्या एक दिवस आधी 1,377 रुग्ण समोर आले होते. 8 मेनंतर मुंबईत मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत.

मुंबईतील पॉजिटिविटी रेट सध्या 4 टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी इंडिया टुडेशी बोलताना, मुंबईत तिसरी लाट सुरू झाली असल्याचेही म्हटले आहे.

डॉ. शशांक जोशी म्हणाले, मुंबईत तिसरी लाट सुरू झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. 4 दिवसांत केसेस दुप्पट होत आहेत. समोर आलेल्या नव्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. संख्या खूप मोठी आहे परंतु आपण त्यास सामोरे जाऊ शकतो. नव्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण ओमाक्रॉनच आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये 80 टक्के नव्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉनची पुष्टी हेईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात, राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे, असे म्हटले होते. काल येथे 77 नवे रुग्ण आढळले. याच्या एक दिवस आधी 47 प्रकरणे समोर आली होती.

केवळ दिल्ली आणि मुंबईच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. गुजरातमध्ये बुधवारी 548 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या 9 जूननंतरची सर्वाधिक संख्या आहे. 9 जून रोजी गुजरातमध्ये 644 रुग्णांची नोंद झाली होती. पश्चिम बंगालमध्येही बुधवारी 1,089 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. ही संख्या 6 महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे.