पुन्हा हाहाकार...? कोरोनाची तिसरी लाट...!; 'या' राज्यांनी घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 20, 2020 07:02 PM2020-11-20T19:02:22+5:302020-11-20T19:14:30+5:30

अनलॉक-6 अंतर्गत सूट मिळाल्यानंतर, अनेक राज्यांत कोरोना गाईडलाईन्स आणि सतर्कतेचा दावा करत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता मुले आणि शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या हरियाणातील प्रकरण चर्चेत आहे. येथे सर्वप्रथम शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट, शाळा बंद - अनलॉक प्रक्रियेअंतर्गत नियम पालनाचा दावा करत अनेक राज्यांत शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र कोरोनासंक्रमण विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचल्याने सरकार आणि प्रशासनही धास्तावले आहे. यामुळे आता अनेक राज्यांत पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मुंबईने तर, यावर्षी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

​हरियाणामध्ये 150हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण - हरियाणातील तीन जिल्ह्यात 150हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शैक्षणिक संस्था काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9वी ते 12वीपर्यंतच्या कोरोनाबाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. यातील अधिकांश विद्यार्थी होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हरियाणातील एकट्या रेवाडी जिल्ह्यात 13 शाळांमधील 91 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जींद येथील काही शाळांतील एकूण 30 विद्यार्थी आणि 10 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कर्नाटकातही शाळा बंदच - कर्नाटकात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय टाळण्यात आला आहे. येथे 17 नोव्हेंबरपासून पदवी आणि पद्व्यूत्तर महाविद्यालये खुली केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री सीएन अश्वनाथ नारायण यासंदर्भात बोलताना म्हणाले, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या आधारेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

उत्तराखंडमध्ये बंद करण्यात आल्या शाळा - उत्तराखंडमध्ये शाळा सुरू केल्यानंतर 5 दिवसांतच 6 नोव्हेंबरला 84 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील 23 शाळांच्या 80 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. खरेतर येथील शाळा स्वच्छ करून पुन्हा उघडण्याच्या इराद्याने पाच दिवसांसाठीच बंद करण्यात आल्या होत्या.

​गुजरातमध्येही शाळा खुल्या करण्याची तारीख पुढे ढकलली - गुजरातमध्ये कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता, शाळा उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शैक्षिणिक संस्था बंद राहतील.

गुजरातमध्ये 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी होती. मात्र, येथे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे सरकार आणि शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलला आहे.

उत्तर प्रदेशात 23 नोव्हेंबरपासून महाविद्यालये आणि विद्यापीठे खुली करण्याचा निर्णय - योगी सरकारने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुठल्याही शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक राहणार नाही, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

​मिझोरममध्येही शाळा बंद - मिझोरममध्ये दोन खासगी शाळांतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र शाळा उघडण्याचा धोका लक्षात घेत मिझोरम सरकारने सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे 16 ऑक्टोबरपासून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या वर्षी मुंबईतील शाळा सुरू होणार नाही - मुंबईमध्ये 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बीएमसीने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचे महापौर किशोरी पेडनेकर म्हणाले, बीएमसीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील. मुंबीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पुन्हा घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय.