Coronavirus: कोरोनातून बरे झाले तरीही धोका वाढला; एका महिन्यात ‘साइटोमेगालो व्हायरस’चे ६ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:41 PM2021-07-08T17:41:03+5:302021-07-08T17:47:16+5:30

Cytomegalovirus: कोरोना झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना स्टेरॉयड औषधांचा अतिवापर झालेला आढळला आहे. त्यातून कोरोना बरे झालेले पुन्हा साइटोमेगालो व्हायरसच्या विळख्यात अडकत आहेत.

कोरोना व्हायरस(Coronavirus) आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी धक्कादायक बातमी आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण साइटोमेगालो व्हायरसच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत साइटोमेगालो व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये साइटोमेगालो व्हायरसचे ६ रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोना झाल्यानंतर २०-३० दिवसांनी या रुग्णांना साइटोमेगालो व्हायरस झाल्याचं कळालं. या रुग्णांवर सध्या दिल्लीत उपचार सुरू आहेत. परंतु या आजारामुळे डॉक्टरांनी रुग्णांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

सध्या कोरोना संक्रमणाची संख्या नियंत्रणात असली तरी पीटीआय रिपोर्टनुसार अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं आढळून आली होती. तेव्हा कोरोनातून बरे होण्यासाठी या रुग्णांना स्टेरॉयड औषधं दिली. परंतु औषधाचा अतिवापर घातक ठरतो.

स्टेरॉयड औषधांच्या सेवणानं रुग्णांचा रिपोर्ट कोविड निगेटिव्ह असल्याचा येतो. परंतु त्यांच्यात साइटोमेगालो व्हायरसची(CMV) लक्षणं दिसून आली आहेत. मागील महिन्यात कोविड १९ च्या आजारानंतर ६ जणांना सीएमबी आजार झाल्याचं कळालं अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर अतहर अंसारी म्हणाले की, सीएमवी आजाराची लक्षणं शरीरातील कोणत्या भागावर त्याचा परिणाम झाला आहे यावर निर्भर आहे. जर संसर्ग फुस्फुस्सांवर झाला असेल तर रुग्णाला ताप येईल. श्वास घेण्यास अडचणी येतील तसेच छातीत दुखणे, खोकला अशी समस्या उद्भवेल.

साइटोमेगालो व्हायरस(Cytomegalovirus)च्या लक्षणांचा विचार केला तर त्यात अनेक प्रकार आहेत. ताप, थकवा यासारखी गंभीर लक्षणं आहेत. यात डोळे, मेंदू अथवा शरीरातील कोणत्याही अंतर्गत भागावर नुकसान होऊ शकतं. किंवा कोणती वेगळी लक्षणंच दिसून येणार नाहीत असंही होऊ शकतं.

अपोलो हॉस्पिटलमध्ये जे ६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यांना हाइपोक्सिया, फुस्फुस्स आणि किडनीवर सूज आल्याची समस्या जाणवली. साइटोमेगालो व्हायरस हा त्या लोकांमध्ये जास्त आढळतो जे एचआयव्ही(HIV) ग्रस्त आहे.

CD4 काऊटं कमी होणे, कँसर निगडीत सर्जरी झाली असेल, किंवा असं कोणतं औषध घेतलं असेल ज्यामुळे इम्युनिटी कमी होईल अशांमध्ये साइटोमेगालो व्हायरस आढळतो. कोविड १९ किंवा त्यातून बरे होण्यासाठी स्टेरॉयड औषध मिळतं त्यानेही इम्युनिटी कमकुवत होण्याचा धोका असतो.

साइटोमेगालो व्हायरस अशा लोकांच्या शरीरावर हल्ला करतं. साइटोमेगालो व्हायरस संबंधित इंफेक्शन पहिल्यापासून ८०-९० टक्के भारतीय लोकसंख्येत आढळते. परंतु इम्युनिटी मजबूत असल्याने त्याचा परिणाम अथवा लक्षणं कुठे दिसत नाहीत. परंतु इम्युनिटी कमी झाल्यास ती लक्षणं दिसतात.

देशभरात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Read in English