CoronaVirus Live Updates : बापरे! शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला; 'या' ठिकाणी 32 विद्यार्थी पॉझिटिव्ह, चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:56 PM2021-09-28T13:56:00+5:302021-09-28T14:05:34+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत.

कोरोनामुळे देशात काही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा तीन कोटीवर पोहोचला आहे. एकूण कोरोनागस्तांची संख्या 3,36,97,581 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,795 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 179 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत तब्बल 4,47,373 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं.

शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 32 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने दहावी आणि बारावीसाठी शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. रिपोर्टनुसार शाळेत येणाऱ्या मुलांची अँटिजेन टेस्ट करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले होते आणि या टेस्टमध्येच 32 मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

राजौरीचे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. शमीम भट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारहाल मेडिकल ब्लॉकच्या आरोग्य विभागाच्या एका टीमने एका खासगी शाळेचा दौरा केला. यावेळी वेगवेगळ्या गावामध्ये राहणारे 32 विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा आणखी प्रसार होऊन नये यासाठी लागण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थ्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी लडाखच्या लेहमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. कोरोनाची 71 नवीन प्रकरणं आढळली होती. त्यानंतर प्रशासनाने 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस शाळा पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.

कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.