CoronaVirus Live Updates : 'कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:31 PM2022-12-22T12:31:49+5:302022-12-22T12:47:07+5:30

CoronaVirus Live Updates : सध्या देशात कोरोनाबाबत काय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते जाणून घेऊया...

जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. चीनपासून अमेरिकेपर्यंत प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिस्थिती अशी आहे की अनेक देशांनीही निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता भारत सरकारनेही तयारी सुरू केली असून, राज्य सरकारनेही बैठका बोलावल्या आहेत.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, सरकारकडून एक नियमावली जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये मास्क घालण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. सध्या देशात कोरोनाबाबत काय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते जाणून घेऊया...

भारतात कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कहर केला, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडली. मात्र, त्यानंतर परिस्थिती सुधारत राहिली आणि प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत गेली. रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोनावरील निर्बंधही शिथिल होऊ लागले आहेत.

अखेर 1 एप्रिल 2022 पासून सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आले. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला आहे, अशा परिस्थितीत सरकारने लोकांना कोरोनाच्या संकटात नीट वागण्याचा आणि योग्य ती काळजी, खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात तर त्याला शारीरिक स्पर्शाशिवाय म्हणजेच टच न करता भेटा. साधारणत: एखाद्याला भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो किंवा मिठी मारतो. पण आता कोरोनाचं सावट असल्याने फिजिकल टच करण्याऐवजी लांबूनच नमस्कार करा.

कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी अंतर ठेवा जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखता येईल. लोकांना सरकारने फेस मास्क पुन्हा वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी नेहमीच मास्क घाला.

जर तुम्ही बाहेर असाल तर तुमच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावणे टाळा. हँड सॅनिटायझर वापरू शकता. सतत हात धुत राहा. कोरोनाला रोखण्यासाठी उघड्यावर थुंकणे टाळावे, असा सल्लाही सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो.

कोरोनाला रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक असतानाच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, म्हणजेच गर्दीपासून दूर राहा, असेही सांगण्यात आले आहे. गर्दीतून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. निष्काळजीपणा देखील घातक ठरण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट टाकू नका, ज्यामुळे नकारात्मक माहिती किंवा भीती पसरण्याचा धोका असेल. जर तुम्हाला कोरोनाबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी विश्वासार्ह सोर्स वापरा.

भारताच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत हे नियम याआधी जारी केले होते. ज्याचे पालन करण्यात आले. भारतात सध्या कोरोनाबाबत घाबरण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र तरी देखील कोरोनाच्या संकटात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.