coronavirus: ६४ लाख रुग्ण, ४५ हजार मृत्यू; एप्रिल महिन्यात देशाने अनुभवला कोरोनाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:02 PM2021-04-30T18:02:05+5:302021-04-30T18:09:57+5:30

coronavirus in India : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या महिनाभरापासून देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कसाबसा तग धरणाऱ्या देशातील आरोग्य यंत्रणेला या दुसऱ्या लाटेने जबरदस्त तडाखा दिला आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या महिनाभरापासून देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कसाबसा तग धरणाऱ्या देशातील आरोग्य यंत्रणेला या दुसऱ्या लाटेने जबरदस्त तडाखा दिला आहे. आज कोरोनाच्या फैलावामुळे जगात सर्वात वाईट परिस्थिती ही भारतामध्ये आहे. त्यामुळे देशातील केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे.

२०२० मध्ये कोरोनाला थोपवण्यात यशस्वी ठरल्याने २०२१ च्या सुरुवातील भाराताने कोरोनाच्या फैलावाला मात दिली आहे, असेच चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र मार्च महिन्यापासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. बघता बघता कोरोनाच्या या लाटेने अक्राळविक्राळ रूप धारण केले. आता एप्रिलच्या अखेरीस भारतात कोरोना बेलगाम झाल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभराच्या आकडेवारीचा विचार केल्यास या एप्रिल महिन्यामध्ये देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर दिसून आला आहे. महिनाभरात देशात कोरोनाचे तब्बल ६४ लाख नवे रुग्ण सापडले आहेत. तर ४५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत महिनाभरात तब्बल २५ लाखांची भर पडली आहे.

२०२१ च्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याने देशाने कोरोनाला हरवल्याचे चित्र होते. मात्र एप्रिल महिन्यात देशात कोरोनाची त्सुनामी आली आणि देशभरातील नव्या कोरोनाबाधिकांच्या, अॅक्टिव्ह रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले. बेसुमार वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि अन्य औषधे मिळणेही अवघड झाले आहे. ऑक्सिजन आणि उपचारांविना अनेक ठिकाणी लोकांचे मृत्यू होत असल्याच्या घटना दररोज कानावर येत आहेत.

देशातील १ एप्रिल रोजीच्या आकडेवारीचा विचार केल्यास एक एप्रिलपर्यंत देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी २३ लाख ०२ हजार ११५ एवढी होती. तर मृतांची संख्या १ लाख ६३ हजार ४२८ एवढी होती. १ एप्रिल रोजी देशात कोरोनाचे ६ लाख १० हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण होते.

तर आज ३० एप्रिल रोजी देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ८७ लाख ५४ हजार ९८४ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ही २ लाख ८ हजार ३१३ एवढी झाली आहे. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१ लाख ६४ हजार ८२५ एवढी झाली आहे.

एप्रिल महिन्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे देशातील अनेक रुग्णालयांमध्ये बेडस् आणि अन्य आवश्यक औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जिथे बाहेरून लोक उपचारांसाठी येतात तिथेही रुग्ण बेड्स आणि ऑक्सिजनसाठी आक्रोश करत आहेत.

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये देशातील अनेक भागात पुन्हा एकदा लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी अन्य मार्ग न उरल्याने महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात साप्ताहिक लॉकडाऊन, १५ दिवसांचे निर्बंध, रात्रीची संचारबंदी, कंटेन्मेंट झोन यासारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.