'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:03 PM2023-08-21T22:03:35+5:302023-08-21T22:10:13+5:30

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन पंजा' ऐकायला येत आहे. यावेळी काँग्रेस भाजप आणि जेडीएसला फोडण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचं बोलले जात आहे. २०१९ च्या ऑपरेशन लोटसचा बदला असंही काही राजकीय तज्ज्ञांना वाटते.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन पंजा’ अंतर्गत भाजपा-जेडीएस आमदारांना ३ ते ४ टप्प्यांत फोडण्याची रणनीती पक्षाची आहे. लवकरच १५ विरोधी आमदारांना पक्षात समाविष्ट केले जाऊ शकते असं कर्नाटक काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे एका न्यूज एजेन्सीने म्हटलं आहे.

सूत्रांनुसार, आमदारांशी यापूर्वीच संपर्क साधण्यात आला असून त्यांच्या पदाबाबत पुढील चर्चा सुरू आहे. यावर शिक्कामोर्तब होताच आमदारांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्यात येणार आहे. 'ऑपरेशन पंजा'च्या चर्चेवर भाजपाचीही प्रतिक्रिया आली आहे. भाजपचा एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नाही असं भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस बोम्मई यांनी दावा केला.

ऑपरेशन लोटसच्या धर्तीवर ऑपरेशन पंजा राबविणार असल्याची चर्चा कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात आहे. याअंतर्गत काँग्रेस विरोधी आमदारांना फोडण्याची रणनीती बनवतंय जे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. याशिवाय जुने म्हैसूर, बेळगावी, बिदर आणि कोस्टल कर्नाटकमधून येणाऱ्या भाजपच्या मजबूत नेत्यांवर काँग्रेसची नजर आहे.

या नेत्यांना सोबत घेऊन २०२४ मध्ये भाजपाला कडवी टक्कर देण्याची रणनीती काँग्रेस तयार करत आहे. कर्नाटकात काँग्रेसने २०२४ मध्ये २० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या पक्षाकडे एकच जागा आहे. त्यामुळे काँग्रेस ऑपरेशन पंजामधून राज्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन पंजा’ची चर्चा सुरु असताना भाजपने घाईघाईने बैठक बोलावली. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे दोन आमदार आले नाहीत. आमदार एसटी सोमशेखर आणि शिवराम हेब्बर बैठकीला अनुपस्थित राहिले. स्थानिक वृत्तपत्र डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीनंतर येडियुरप्पा म्हणाले की, काही आमदार भाजपा सोडण्याचा विचार करत आहेत, मात्र आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत.

येडियुरप्पा यांच्या घरी झालेल्या भाजपच्या बैठकीला गैरहजर असलेले आमदार सोमशेखर यांनी डीके शिवकुमार यांचे राजकीय गुरू असल्याचे म्हटलं. सोमशेखर यांच्या वक्तव्यानंतर ऑपरेशन पंजाबाबत दुजोरा मिळाला. आपल्या समर्थकांशी बोलताना सोमशेखर म्हणाले - मी जिथे आहे तिथे मी खूश नाही. सोमशेखर भाजप हायकमांडवर नाराज आहेत. या भागात आपल्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर पक्षाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

कर्नाटकातील प्रादेशिक पक्ष जनता दल सेक्युलरमध्येही नाराजीचे वृत्त आहे. जेडीएसचे १०-१२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन तृतीयांश आमदारांना एकत्र आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. जेडीएसकडे सध्या १९ आमदार असून १४ आमदार एकत्र आले तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार नाही.

१३५ जागा जिंकून सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला ४२ टक्के मते मिळाली. तसेच ६६ जागा जिंकणाऱ्या भाजपला ३६ टक्के मते मिळाली आहेत. कर्नाटकातील निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीएस युतीची चर्चा सुरू आहे. दोघांची युती झाली तर मतांची टक्केवारी ५० च्या जवळपास पोहोचेल. हे रोखण्यासाठी काँग्रेस रणनीती आखत आहे. संपूर्ण व्होटबँक बदलण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यासाठी जेडीएसमध्ये मोठी फूट आवश्यक आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत ऑपरेशन पंजा सुरू राहणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. भाजप आणि जेडीएसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची काँग्रेसची रणनीती आहे. कर्नाटकात विरोधी पक्षनेतेपदाची निवड न करण्याचा मुद्दा काँग्रेस सातत्याने उचलत आहे. मे महिन्यात निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून कर्नाटकात भाजपला विरोधी पक्षनेता निवडता आलेला नाही.