उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:03 PM2024-05-07T15:03:22+5:302024-05-07T15:04:33+5:30

Maharaashtra Lok Sabha Election 2024: शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी पालघरमध्ये हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता पालघरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून, तिकीट कापण्यात आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Maharaashtra Lok Sabha Election 2024: MP Rajendra Gavit from Shinden group who did not get candidature in BJP, Devendra Fadnavis said... | उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपादरम्यान, काही जागांवरून तिढा निर्माण झाला होता. त्यात शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाकडे असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे घेतला होता. तसेच येथील शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता पालघरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून, तिकीट कापण्यात आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, राजेंद्र गावित यांच्या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गावित यांचे पुन्हा एकदा पक्षात स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र गावित यांचा उपयोग आम्हाला महाराष्ट्रामध्ये अधिक आहे, असे सांगितले.

मुळचे काँग्रेसमधील असलेल्या राजेंद्र गावित यांनी २०१८ मध्ये झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत करत राजेंद्र गावित हे खासदार झाले. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने गावित यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली. तसेच ते विजयीदेखील झाले. दरम्यान, २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र यावेळी जागावाटपात पालघरचा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाकडे गेला. मात्र भाजपाने इथून नवा उमेदवार देताना हेमंत सवरा यांना संधी दिली. तेव्हापासून राजेंद्र गावित हे नाराज होते, अशी चर्चा आहे. मात्र आज अखेरीस त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

राजेंद्र गावित यांच्या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा एकदा भाजपाला मिळाली. तेव्हा राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली. तसेच राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये अधिक आहे, असा विचार पक्षाने केला. तसेच मंत्री म्हणून त्यांचा जो काही अनुभव आहे. त्यामुळे जेवढा त्यांचा उपयोग राज्यामध्ये होऊ शकतो, तेवढा कदाचित दिल्लीत होणार नाही. कारण दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते काम करतील. पण महाराष्ट्रात अधिक संधी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील होकार दिला. त्यानंतर त्यांच्या संमतीनेच आम्ही पालघरमधील आमचे उमेदवार बदलले आणि डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.   

Web Title: Maharaashtra Lok Sabha Election 2024: MP Rajendra Gavit from Shinden group who did not get candidature in BJP, Devendra Fadnavis said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.