लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:30 IST2025-04-17T13:16:28+5:302025-04-17T13:30:45+5:30

Latest News on banned drugs in India: देशातील केंद्रीय औषधी गुणवत्ता नियामक संस्था असलेल्या सीडीएससीओने एक मोठा निर्णय घेत दैनंदिन जीवनात लोक सेवन करत असलेल्या ३५ औषधांवर बंदी घातली आहे. तरतुदींचे कडक पालन निर्देशही संस्थेने दिले आहेत.

देशातील औषधी नियामक सर्वोच्च संस्था सीडीएससीओने ३५ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांचे उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घातली आहे.

वेदनाशामक, पोषणसंबंधी पूरक आहार व मधुमेह रोधी औषधांचा यात समावेश असून, याच्या बंदीबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले आहेत.

एफडीसी या अशा औषधी आहेत, ज्यात एका निश्चित प्रमाणात दोन किंवा अधिक फार्मास्युटिकल घटकांचा वापर केलेला असतो.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना असा एफडीसीसाठी आढावा घेण्यास व तरतुदींचे कडक पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

काही एफडीसी औषधींना सुरक्षा व परिणामकारकतेच्या पूर्व मूल्यांकनाशिवाय उत्पादन, विक्री व वितरणाचे परवाने देण्यात आले होते. त्यामुळे लोकांचे आरोग्य व सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. अशा औषधींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

११ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) डॉ. राजीव रघुवंशी यांनी त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या जानेवारी २०१३ च्या पत्राचा हवाला दिला आहे.

भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) डॉ. राजीव रघुवंशी यांनी पत्रात म्हटले आहे की, सुरक्षा व परिणामकारकतेच्या पूर्व मूल्यांकनानुसार काही एफडीसी औषधींचे उत्पादन, विक्री व वितरणाचे परवाने दिले आहेत. यामुळे लोकांचे आरोग्य व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.