भाजपाच धुरंधर, इतर पक्षांपेक्षा १० पट निधी; देणग्यांमध्ये १७१% वाढ, किती कोटींची केली कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:55 IST2026-03-27T08:43:47+5:302026-03-27T08:55:18+5:30
भाजप आवडे देणगीदारांना, पुन्हा एकदा सर्वच पक्षांना मागे टाकले, एका वर्षातील वाढीचा वेग पाहून थक्क व्हाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा सर्वच पक्षांना मागे टाकले आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भाजपला मिळालेला निधी हा इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीच्या १० पटींहून अधिक आहे.

२०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांमध्ये १६१ टक्क्यांनी वाढ झाली. सर्व राष्ट्रीय पक्षांना २० हजार रुपयांच्या वर एकूण ६,६४८.५६३ कोटी रुपयांच्या देणग्या (११,३४३ योगदान) मिळाल्या आहेत.

एका वर्षात भाजपच्या निधीत १७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे (२,२४३ कोटींवरून थेट ६,०७४ कोटी). काँग्रेसच्या निधीत ८४ टक्क्यांनी, तर आम आदमी पार्टीच्या निधीत २४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. बसपाला केवळ २० हजार रुपये मिळाले.

राजकीय निधीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण देणग्यांपैकी ९२.१८% (६,१२८.७८७ कोटी रुपये) वाटा हा कॉर्पोरेट क्षेत्राचा आहे, तर केवळ ७.६१% (५०५.६६ कोटी रुपये) वाटा वैयक्तिक देणगीदारांचा आहे.

भाजप : कॉर्पोरेट क्षेत्राकडून ५,७१७.१६७ कोटी रुपये मिळाले (इतर सर्व पक्षांच्या तुलनेत १३ पट अधिक).

काँग्रेस : कॉर्पोरेट क्षेत्राकडून ३८३.८६ कोटी रुपये आणि वैयक्तिक देणगीदारांकडून १३२.३९ कोटी रुपये मिळाले.

प्रमुख देणगीदार आणि इलेक्टोरल ट्रस्ट - राजकीय पक्षांना सर्वाधिक निधी 'इलेक्टोरल ट्रस्ट'च्या माध्यमातून मिळाला आहे.

प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट : या ट्रस्टने एकूण २,४१३.४६५ कोटी रुपये दान केले. त्यातील २,१८०.७१ कोटी भाजपला, २१६.३३ कोटी काँग्रेसला आणि १६.४१ कोटी 'आप'ला मिळाले. प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट: ८३४.९७कोटी रुपये. एबी जनरल इलेक्टोरल ट्रस्ट : ६२१ कोटी रुपये.

















