“राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन”; मुस्लीम नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:11 PM2020-07-26T15:11:41+5:302020-07-26T15:16:01+5:30

अयोध्येत येत्या ५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्यदिव्य प्रभू राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्लीम कारसेवक मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजम खान यांनी अयोध्येला पोहचून प्रतिज्ञा घेतली आहे.

जर ५ ऑगस्टच्या राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण मिळालं नाही तर त्याचदिवशी शरयू नदीत जलसमाधी घेईन असा इशारा मुस्लीम कारसेवक मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजम खान यांनी दिलं आहे.

मी राम मंदिरासाठी आंदोलन केले होते, प्रभू रामाला मी मानतो, मी रामभक्त आहे असा दावा आजम खान यांनी केला आहे.

त्यासोबत प्रभू रामाला कोणत्याही जाती-धर्मात बांधू शकत नाही, त्यामुळे या पुण्य कार्यक्रमात राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार होण्याची माझी इच्छा आहे. प्रभू रामाला मी आपलं आराध्य मानतो असं ते म्हणाले.

ज्याप्रकारे प्रभू राम, लक्ष्मण यांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली, त्याप्रकारे मीदेखील जलसमाधी घेईल. आजम खान यांनी रामलल्लाचं दर्शन करत राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या स्वर्गीय महंत रामच्रंद दास यांच्या समाधीचं दर्शनही घेतले.

सध्या देशात कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याने राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात अत्यंत कमी लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. फक्त २०० जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडेल, या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रण पाठवणार असल्याचं सांगितले जात आहे.

दरम्यान,. राम मंदिर हा भावनेचा विषय आहे. मी मुख्यमंत्री असल्याने तिथे जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल, याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची तिथे उपस्थित राहण्याची इच्छा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच मी अयोध्येला जाऊन येईन. पण लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचं काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.