'मृत' आजोबांचा फोटो दाखवत 'तो' गाडीनं सुस्साट सुटला; पोलिसांनी चौकशी केली अन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:26 PM2020-04-30T15:26:21+5:302020-04-30T16:33:09+5:30

भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला आहे तर 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये, मृतांची आकडा ४०० पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोरोना आता अधिकच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार घरीच राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी काम नसतानाही लोकं घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोकं अडकून पडली आहे. त्यांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारकडून उपाय शोधले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी पोलिसांनाच खोटं काहीतरी सांगून घरी जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंबरनाथमधील एका तरुणाने रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे जाण्यासाठी चक्क आजोबांचे निधन झाल्याचे कारण पोलिसांना सांगितले. तसेच आजोबांचा एक जूना फोटो दाखवून त्या तरुणाने मुंबई ते राजापूरपर्यत त्याचा गाडीने प्रवास केला.

आजोबांचं निधन झाल्याचं खोटे सांगत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अंबरनाथ येथून पोलिसांना चकवा देत राजापूरपर्यत त्याला प्रवास करण्यात यश आले.

त्यानंतर कशेडी घाटात खेड पोलिसांनी त्या तरुणाची गाडी थांबवून विचारपूस केली. त्यावेळी तरुणाने खेड पोलिसांना देखील रडत माझ्या आजोबांचे रात्री निधन झाल्याचे कारण सांगितले. त्याचप्रमाणे खेड पोलिसांना देखील त्याने आजोबांचा मोबाईलमधला जूना फोटो दाखवला.

पोलिसांना हा फोटो बघून थोडी शंका आली. त्यामुळे पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात संपर्क करून त्याच्या पत्यावरून वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र अशी कोणतीच घटना घडली नसल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. यानंतर हा तरुण खोटं बोलत असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर खेड पोलिसांनी तरुणाची गाडी पोलिसांनी जप्त केली आणि 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.