अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:54 PM2024-05-05T21:54:52+5:302024-05-05T21:57:12+5:30

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभांमधून करण्यात आलेल्या वातावरणनिर्मितीमुळे बारामतीतील लढत रंगतदार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Ajit Pawars meetings will benefit Sunetra Pawar in Baramati Lok Sabha constituency | अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?

अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?

Baramati Lok Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी बारामती लोकसभा मतदारसंघांचीच राज्यात सर्वाधिक चर्चा होत आहे. कारण बारामतीत यंदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना रंगत आहे. सुप्रिया सुळे या विजयी चौकार लगावणार की सुनेत्रा पवार विजयश्री खेचून आणणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभा आणि त्या माध्यमातून करण्यात आलेल्या वातावरणनिर्मितीमुळे बारामतीतील लढत रंगतदार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. बारामती विधानसभा मतदारसंघासह बारामती लोकसभा मतदारसंघावरही गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि कुटुंबातील फुटीनंतर आता ही ताकद विभागली गेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण सरकारसोबत जायला हवं, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती. मात्र या भूमिकेला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर आपण बारामती मतदारसंघात आपल्या विचारांचा उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ते कुटुंबातील व्यक्तीला निवडणुकीच्या मैदानात उतरवतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अखेर अजित पवार यांनी तो कठोर निर्णय घेतला आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करून टाकली.

वेळ मिळाल्याने वातावरण बदलण्यास मिळाली संधी

राष्ट्रवादीत फूट पडून जवळपास वर्षभराचा कालावधी होत आला आहे. दरम्यानच्या काळात ही भूमिका का घेतली, हे अजित पवार हे लोकांना सांगत होते. मात्र निवडणुकीच्या काळात अजित पवारांच्या भूमिकेला धार चढली आणि ते आणखी ठामपणे आपली भूमिका मांडू लागली. शरद पवार यांची साथ सोडण्यामागे नक्की कोणती कारणे होती, बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन का गरजेचं आहे आणि परिवर्तन झाल्यानंतर जनतेला कोणता फायदा होऊ शकेल, हे अजित पवार आपल्या सभांमधून सविस्तरपणे मांडू लागले. याचा परिणाम असा झाला की सुरुवातीला काहीसे कचरणारे अजित पवार यांचे समर्थक नंतर मात्र आक्रमकपणे अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे समर्थन करू लागले. विकासाच्या मुद्द्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी युक्तिवाद करू लागले. या माध्यमातून बारामतीत सुरुवातीला कठीण वाटणारी लढाई अजित पवारांनी शेवटचा टप्पा येईपर्यंत रंजक स्थितीत आणून ठेवली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी बारामतीत नुकत्याच घेतलेल्या महिला मेळाव्यात त्यांच्या आई प्रतिभा पवार यादेखील सहभागी झाल्या होत्या. राजकीय व्यासपीठांवर क्वचितच दिसणाऱ्या प्रतिभा पवारही सुळे यांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे हे बारामतीतील लढाई अटीतटीची झाल्याचं द्योतक आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पवार कुटुंबात एकटे पडल्याने मिळणार सहानुभूती?

अजित पवार यांचं कुटुंब वगळता पवार कुटुंबातील इतर अनेक सदस्यांनी सुप्रिया सुळे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सुळे यांना प्रचारात या सदस्यांचा फायदा होत असला तरी अजित पवार कुटुंबात एकटे पडले असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून यातून त्यांना सहानुभूती मिळण्याचीही शक्यता बळावली आहे. 

दरम्यान, बारामतीत आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून ७ मे रोजी होणाऱ्या मतदानात बारामतीतील मतदार कोणाच्या बाजूने आपला कल नोंदवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Ajit Pawars meetings will benefit Sunetra Pawar in Baramati Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.