कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:38 IST2025-10-09T13:19:09+5:302025-10-09T13:38:40+5:30
Sharad Pawar Letter To Railway Minister Ashwini Vaishnaw About Konkan Railway: शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. ट्रेनची यादीच देत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे.

Sharad Pawar Letter To Railway Minister About Konkan Railway: दिवसेंदिवस कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गणपती, नवरात्र, दिवाळी, नववर्ष, शिमगा, मे महिना वगळताही कोकणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. यामुळे ट्रेनची तिकिटे मिळणे जिकिरीचे होते.
तसेच कोकण रेल्वेवरील अनेक एक्स्प्रेस ट्रेन ठराविक ठिकाणीच थांबत असल्याने इच्छित स्थळी जाण्यासाठी ट्रेनची संख्या मर्यादित होते. कोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि पर्यटकांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. यातच कोकणवासीयांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून कोकणवासीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे.
शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली आहे. याबाबत शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या 'कोकण रेल्वे'च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्र लिहिले.
महाराष्ट्रातील 'सिंधुदुर्ग' हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी सुप्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात व प्रमुख सणांच्या काळात म्हणजेच गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी दरम्यान निवडक एक्सप्रेस गाड्यांना (तपशील पत्रात दिला आहे) कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्राद्वारे केली.
यामुळे या तळकोकणातील आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासात सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल तसंच सर्वसामान्य कोकणवासीय माणसांच्या प्रलंबित मागणीला योग्य न्याय मिळेल.
शरद पवारांनी पत्रासह कोणत्या एक्स्प्रेस ट्रेनना कुठे थांबा हवा आहे, याची यादीच दिली आहे. या निवेदनात शरद पवार यांनी एकूण ३२ एक्स्प्रेस गाड्यांचा उल्लेख केला असून, या यादीतील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर थांबा देण्याची मागणी जोर लावून धरली आहे.
दरम्यान, आताच्या घडीला भारताची सर्वांत प्रिमियम, लोकप्रिय, वेगवान आणि आरामदायी ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन. मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात.
आता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे नियमित वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडा चालवली जाणार आहे. पावसाळ्यात केवळ तीन दिवस चालणारी ट्रेन आता आठवडाभर चालणार आहे.
देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. पण, मुंबई-गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून, प्रवाशांची मागणी असून, ८ डब्यांच्या सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस डब्यात वाढ करण्यात आली नाही.