जवळचा मित्र सोबत नाही याचं दु:ख, अजित पवारांना आबांची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:10 PM2021-08-16T15:10:55+5:302021-08-16T15:24:42+5:30

दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आज जयंती. त्यानिमित्त महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांनी आर.आर. आबांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली आहे.

१९९१ ते २०१५ अशी तब्बल १४ वर्षे तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून आर. आर. पाटील यांनी राजकीय कारकीर्द पार पडली.

महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही भूषवलेल्या आबांनी आपल्या शांत आणि सभ्य व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.

मुंबईत १६ फेब्रुवारी २०१५ रोजी लीलावती रुग्णालयात कॅन्सरने त्यांचे निधन झाले होते. महाराष्ट्राने एक कर्तृत्वान नेता आणि चांगला माणूस गमवला. याचं दु:ख आजही महाराष्ट्राला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आबांना आदरांजली वाहिली.

ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं.

पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या आबांच्या निर्णयाने हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली.

डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले.

शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेलं, आपलंसं वाटणारं त्यांचं नेतृत्व होतं असं सांगत स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले, असे अजित पवार यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही आर.आर. आबांच्या आठवणी जागवल्या असून त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे.