राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:55 IST2025-12-25T13:36:12+5:302025-12-25T13:55:11+5:30
Pune Nagpur Vande Bharat Train New Time Table: राज्यातील सर्वांत लांब अंतराच्या वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्यात आला आहे. २६ डिसेंबरपासून नवीन टाइम टेबल लागू केले जाणार आहे. जाणून घ्या...

Pune Nagpur Vande Bharat Train New Time Table: भारतीय रेल्वेच्या इतिहासात राजधानी, शताब्दीनंतर आता वंदे भारत ट्रेन सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. किंबहुना राजधानी ट्रेनपेक्षाही वंदे भारत एक्स्प्रेसची क्रेझ प्रवाशांमध्ये अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरात सुमारे १६० सेवा वंदे भारत देते. यातील बहुतांश ट्रेनना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असून, अनेक ट्रेनचे कोच ८ वरून १६ ते २० करण्यात आले आहेत.

भारतीय रेल्वेच्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने मोठा इतिहास घडवला आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. अल्पावधीत प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला लाभला आहे.

यातच पुणे ते नागपूर या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२५ पासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. पुणे ते अजनी या वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्यात आला आहे. याचा प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊया...

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास कमी वेळेत आणि आणखी सुपरफास्ट होईल. पुणे ते अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६१०१ च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही ट्रेन आता आणखी जलद गतीने तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. रेल्वेने या वेळेत बदल करण्यास मान्यता दिली आहे.

नवीन वेळापत्रक २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल. सुधारित वेळापत्रकानुसार, ही गाडी अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर अंदाजे १० मिनिटे आधी पोहोचेल आणि या स्थानकांवरून १० मिनिटे आधी सुटेल. शिवाय, ती वर्धा स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचेल.

पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून सहा दिवस सेवा देते. गाडी क्रमांक २०६१०१ पुणे -अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन नागपूर विभागातील प्रमुख स्थानकांवर तिच्या आधीच्या वेळापत्रकापेक्षा लवकर पोहोचेल.

अकोला, बडनेरा आणि वर्धा या तीन स्थानकांवर ट्रेनचे आगमन आणि सुटण्याची वेळ पूर्वीपेक्षा १० मिनिटे आधी करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि मौल्यवान वेळ वाचेल, असे म्हटले जात आहे.

या ट्रेनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे रेल्वेने वेळापत्रक बदल केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पुणे ते नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास सुरू करावा, असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.

रेल्वेने प्रवाशांना नवीन वेळापत्रकानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या, वंदे भारत एक्स्प्रेसला देशभरातील प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील विविध मार्गांवर अनेक वंदे भारत ट्रेन यशस्वीपणे सेवा देत आहेत.

पुणे नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही ट्रेन पुण्याहून सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सुटते. तर अजनी नागपूरहून सकाळी ०९ वाजून ५० मिनिटांनी सुटते. पुण्याहून गुरुवारी, तर नागपूरहून सोमवारी ही ट्रेन सेवा देत नाही.

नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत, ज्यात विदर्भातील लोकांची संख्या जास्त आहे. परंतु पुण्यावरून खान्देश आणि विदर्भात जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे सेवा कमी असल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. यातच वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यामुळे याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सध्या भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत एक्स्प्रेस ठरली आहे. ही ट्रेन एकूण ८८१ किमी अंतर सुमारे १२ तासांत पूर्ण करते. या ट्रेनला एकूण १० थांबे आहेत. नागपूर-पुणे मार्गावरील ही सर्वांत वेगवान ट्रेनही आहे.

















