एकाच घरात दोन, तर अर्धा डझनावर 'घरंदाज' मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:24 PM2019-12-30T15:24:26+5:302019-12-30T15:32:03+5:30

महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशी दोन मंत्रीपदे ठाकरेंच्या एकाच घरात गेली आहेत. तर अनेक नेत्यांना वगळल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचे सूरही आहेत. तर तीन अपक्षांना मंत्रिपदाची संधी शिवसेनेने दिली आहे. याचबरोबर ३६ पैकी सहा नवनिर्वाचित मंत्र्यांना राजकीय घराण्याची पार्श्वभुमी आहे.

ठाकरे सरकारमध्ये दोन नंबरचे नेते म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिले जाते. या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. शेवटच्या क्षणी आदित्य यांचे नाव राज्यपालांना देण्य़ात येणाऱ्या यादीमध्ये घालण्यात आले. आदित्य यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आहे. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री असा योगायोग होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित देशमुख यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. त्यांच्याबरोबर मोठे बंधू धीरज देशमुखही जिंकले आहेत. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर बऱ्याच वर्षांनी देशमुख घराण्यामध्ये मंत्रिपद गेले आहे.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना शपथ घेताना राज्यपालांनी केवळ शपथच वाचा, मागे पुढे काही बोलू नका, असा दम भरला. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद भूषविले होते.

काँग्रेसचे कार्य़ाध्यक्ष विश्वजित कदम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे ते पूत्र आहेत.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आमदारकीवर तुळशीपत्र ठेवत लोकसभा गाठली आहे. यामुळे त्यांच्या जागी कन्या आदिती तटकरे यांनी निवडणूक लढविली होती. आज आदिती यांनी शपथ घेतली.

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार शंकरराव गडाख यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. निकाल लागल्यानंतर भजप-शिवसेना वादात त्यांनी बच्चू कडूंसोबत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. याची बक्षिसी त्यांना मिळाली आहे. शंकरराव हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे ते पूत्र आहेत. निवडणुकीवेळी शंकररावांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.