उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:14 PM2022-07-01T19:14:00+5:302022-07-01T19:21:09+5:30

मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही.

नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. तसेच सर्व बंडखोर आमदार २ जुलै रोजी मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी, शिवसेनेतील अभूतपूर्व बंडखोरीनंतर पराकोटीला गेलेल्या सत्तासंघर्षात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार येत आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे किंवा त्यांची मालमत्ता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती जाणून घेऊया...

मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आगामी काळात कार्यरत असल्याचे दिसणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३.७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी २०१४ च्या तुलनेत १०० टक्के अधिक आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती २०१४ मधील १.८१ कोटी रुपयांच्या तुलनेत ३.७८ कोटी इतकी आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही मुंबई अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. बँक बॅलन्सबाबत बोलायचे झाले तर फडणवीस यांच्याकडे आठ लाख २९ हजार ६६५ रुपये बँकेत आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे २.३३ कोटी रुपये बँकेत असल्याचे सांगितले जात आहे.

एका रिक्षाचालकापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रत्रिज्ञापत्रात शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाखाहून अधिक संपत्ती आहे.

यातील ९.४५ कोटी ही स्थिर तर २.१० कोटी इतकी अस्थिर संपत्ती आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांचा प्रवास सुरू झाल्याने पक्षासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. सेनेसाठी ते तुरुंगात देखील गेलेत. त्यांच्यावर १८ गुन्हा दाखल आहेत. शिंदे यांच्याकडे सात गाड्या असून त्याची एकूण किंमत ४६ लाख इतकी आहे.

उद्धव ठाकरे २०२० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार झाले. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १४३ कोटी २६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. इतकंच नाहीतर उद्धव यांच्यावर १५ कोटी ५० हजार रुपयांची देणेदारीही आहे.

उद्धव ठाकरे हे दोन बंगल्यांचे मालक आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे ७६.५९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पैकी ५२.४४ कोटी रुपये स्थावर आणि २४.१४ कोटी रुपयांची अस्थिर मालमत्ता आहे.

उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ६५.०९ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी २८.९२ कोटी रुपये स्थावर आणि ३६.१६ कोटी रुपये अस्थिर संपत्ती आहेत.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ही एका विद्यमान आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही संपत्तीच्या बाबतीत मागे नाहीत.