Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, शिवसेनेच्या गोटातून मोठी माहिती आली समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:44 AM2022-06-21T10:44:50+5:302022-06-21T11:13:40+5:30

Eknath Shinde: शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळीपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंनी असं पाऊल का उचललं? यामागची महत्वाची कारणं समोर आली आहेत. ती जाणून घेऊयात...

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात सुरु झाल्या आहेत. शिवसेनेची १२ मतं फुटल्याचा प्रकार काल उघडकीस आला. त्यानंतर काल संध्याकाळपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते आणि आता त्यांच्यासोबत काही आमदारही नॉट रिचेबल आहेत.

एकनाथ शिंदेंसोबत नेमके किती आमदार आहेत याची माहिती समोर येऊ शकली नसली तरी शिंदे यांच्या नाराजीची काही कारणं आता शिवसेनेच्या गोटातून समोर आली आहेत. शिवसेनेतल्या एका वरिष्ठ नेत्यानेच 'लोकमत'ला ही 'आतली' माहिती दिली आहे.

शिवसेनेच्या मंत्रिपदांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जात असलं तरी त्यांना मिळालेल्या मंत्रिपदामध्ये इतर दोन मंत्री सातत्यानं हस्तक्षेप करत होते त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. नगरविकास मंत्रिपद असूनही मनमोकळेपणानं काम करता येत नसल्याची शिंदे यांची नाराजी होती असं सांगितलं जात आहे.

नगरविकास मंत्रीपद असूनही कोणताही निर्णय घेताना किंवा फाइलवर सही करण्याआधी एकनाथ शिंदे यांना प्रत्येकवेळी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेण्यास सांगितलं जात होतं. त्यांच्याच खात्याचे सचिव आणि आयएएस अधिकाऱ्यांकडून तसं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात येत होतं. त्यामुळे शिंदे नाराज होते.

राज्यसभेत अजित पवारांच्या गटानं फडणवीसांना मदत केली अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवारांविरुद्धच्या स्पर्धेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारच्या सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्तम संवाद होता. पण कालांतरानं चित्र पालटलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद कमी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत संवाद कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे देखील दुरावले गेले होते. शिवसेनेचे इतर काही नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय बनले पण एकनाथ शिंदे यांची आपल्याला डावललं जातंय अशी भावना निर्माण होऊ लागली. याचाच परिणाम आज पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना सरकारमध्ये अधिक महत्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरुनही एकनाथ शिंदे नाराज होते असं सांगण्यात येत आहे. पक्षाबाबतचे निर्णय घेताना एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं याची खंत त्यांच्या मनात होती.

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी देताना एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेण्यात आलं नाही. पक्षानं या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास न दाखवता संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्यासह युवासेनेचे नेते सुरज चव्हाण यांच्याकडे दिली होती. याचीच खंत एकनाथ शिंदेंना होती.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि त्यांच्या वक्तव्यांवर एकनाथ शिंदे नाराज होते अशी माहिती समोर आली आहे. संजय राऊत प्रत्येकवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच बाजू मांडत असून शिवसेनेला याचा फटका बसत असल्याचं मत एकनाथ शिंदेंचं होतं. याबाबतही एकनाथ शिंदे नाराज होते.

एकनाथ शिंदे सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर आतापर्यंत शिवसेनेचे तब्बल २५ ते ३० आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट निर्माण झाली आहे. आता उद्धव ठाकरे पक्षाला कसं सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. ते नेमके कोणती भूमिका मांडतात यातूनच सर्व चित्र स्पष्ट होईल.