परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 05:49 PM2024-05-22T17:49:39+5:302024-05-22T18:05:39+5:30

रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे.

Mahadev Jankar predicted Parbhani Baramati Beed Lok Sabha election results | परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज

परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज

Mahadev Jankar ( Marathi News ) : महाराष्ट्रात सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून कोणत्या जागेवर नक्की कोण विजयी होणार, याबाबतचे दावे-प्रतिदावे राजकीय नेत्यांकडून केले जात आहे. अशातच रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनीही आपला अंदाज वर्तवला असून परभणीत तर माझा विजय होईलच, पण बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बारामतीतही सुनेत्रा पवार या विजयी होतील, असा दावा जानकर यांनी केला आहे.

"महाराष्ट्रात बीड आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला. तिकडे पंकजा मुंडे आणि इकडे मी असे दोन्ही ओबीसी उमेदवार असल्याने महाविकास आघाडीने जातीवादाचे षडयंत्र केले. एक व्यक्ती या दोनच मतदारसंघांमध्ये फिरला. मात्र असं असलं तरी परभणीत मी ३० ते ४० हजार मतांनी विजयी होईल आणि बीडमध्येही पंकजा मुंडे यांचाच विजय होईल," असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्रात पवार-ठाकरेंबाबत सहानुभूती, पण..."

राज्यात फिरताना मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात सहानुभूती असल्याचं जाणवलं, असंही महादेव जानकरांनी म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी पवार-ठाकरेंकडे ग्राऊंडवर केडर नसल्याने या सहानुभूतीचं मतात रुपांतर होणार नाही आणि राज्यात महायुती ४२ जागा जिंकेल, असा अंदाज जानकर यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी आणि पाथरी या तालुक्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार संजय जाधव यांना मताधिक्य मिळेल, मात्र गंगाखेड, जिंतूर, परतूर आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये मात्र मला चांगली मते मिळतील, असा दावा महादेव जानकरांनी केला आहे.

परभणीत कशी होती राजकीय समीकरणे?

परभणीत लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात शिवाजीराव देशमुख वगळता आजपर्यंत कुणालाच तिसऱ्यांदा खासदार होता आले नाही. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना देशमुख यांच्या हॅट्रिकशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून बाजी मारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय जाधव हे दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदार राहिले असल्याने त्यांची मतदारसंघावर पकड आहे. तर दुसरीकडे रापसच्या जानकर यांच्या पक्षाचा मतदारसंघात एक आमदार असून महायुतीचे आमदार, पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी राबताना दिसले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार होते. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला. हा उमेदवार किती मते घेणार म्हणजेच कुणाची आणि किती मते खाणार हा मुद्दा देखील कळीचा ठरणार आहे. यावरच विजयी कोण होणार हे ठरेल, अशीच परिस्थिती आहे.
 

Web Title: Mahadev Jankar predicted Parbhani Baramati Beed Lok Sabha election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.