मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या सूनेने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:59 PM2022-07-26T18:59:09+5:302022-07-26T19:02:49+5:30

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. त्यात आता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून दोन्ही गटामध्ये वाद सुरू आहेत.

माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, हिंमत असेल तर तुमच्या आई वडिलांचे फोटो लावा आणि मते मागा अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केली. त्याला बाळासाहेब देशाचे नेते होते. त्यांच्यावर आमचाही अधिकार आहे असं प्रत्युत्तर शिंदे गटातील आमदारांनी दिले.

त्यातच आता पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचल्या होत्या.

सह्याद्री अतिथीगृहात स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. इतकी वर्षे सक्रीय राजकारणापासून स्मिता ठाकरे दूर आहेत. उद्धव ठाकरेंमुळे त्या नाराज होत्या. स्मिता ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. स्मिता ठाकरे हे जयदेव ठाकरेंच्या पत्नी आहेत. शिंदे यांना खूप वर्षापासून ओळखते. एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहतो असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत एकनाथ शिंदे आमचे जुने कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे कार्य पाहतेय. कुटुंब म्हणून नव्हे तर एख व्यक्ती म्हणून मी शुभेच्छा द्यायला आले आहे. मी एक एनजीओ चालवते आणि त्यादृष्टीने शुभेच्छा देण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असं त्या म्हणाल्या.

सध्या राजकीय रणांगणात खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी स्मिता ठाकरेंना तुम्ही शिंदे-ठाकरे कोणत्या गटाला समर्थन करणार असा प्रश्न विचारला त्यावर भाष्य करणं स्मिता ठाकरेंनी टाळलं.

शिवसेनेच्या पूर्वीच्या कारकिर्दीत स्मिता ठाकरे सक्रीय होत्या. १९९९ मध्ये शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षात दोन गट पडले. राज आणि उद्धव ठाकरे असा हा गट होता. परंतु या दोघांव्यतिरिक्त स्मिता ठाकरेही बऱ्याच सक्रीय होत्या. कालांतराने स्मिता ठाकरे राजकारणातून दूर गेल्या.

स्मिता ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या. १९८७ मध्ये त्यांचा विवाह पार पडला. शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात स्मिता ठाकरेंचा राजकीय वावर वाढला होता. परंतु उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीला नाराज होऊन स्मिता ठाकरे राजकारणातून बाजूला गेल्या.

२००८-९ च्या काळात ज्यावेळी स्मिता ठाकरेंना राज्यसभेत सदस्यपद हवं होतं, तेव्हा शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून राज्यसभेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांना पाठवलं आणि स्मिता ठाकरेंच्या आशा मावळल्या.