'हे' आहे जगातील सर्वात खोल ठिकाण, यात बसू शकतो अख्खा 'माउंट एव्हरेस्‍ट' पर्वत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:27 PM2021-10-03T18:27:44+5:302021-10-03T18:32:27+5:30

या ठिकाणाच्या खोलीपर्यंत आतापर्यंत फक्त 2 जण जाऊ शकले आहेत.

नवी दिल्ली: जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट आहे, हे अनेकांना माहिती असेल. पण, जगातील सर्वात खोल ठिकाण कोणतं आहे, याची माहिती खूप कमी लोकांना माहिती असेल. समुद्रात असं एक ठिकाणं आहे, ज्यात अख्खा माउंट एव्हरेस्ट पर्वत बसू शकतो. जाणून घ्या हे ठिकाण कुठं आहे ?

पॅसिफिक महासागर ज्याला प्रशांत महासागर नावानेही ओळखले जाते, हे जगातील सर्वात मोठे महासागर आहे. याच महासागरात ''मारियाना ट्रेंच'' नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणाची खोली इतकी आहे की, यात अख्खा माउंट एव्हरेस्ट पर्वत बसू शकतो. माउंट एव्हरेस्ट पर्वत बसवल्यानंतरही या मारियाना ट्रेंचचा खड्डा भरून निघणार नाही. हे ठिकाण प्रशांत महासागराच्या पूर्वेला असून, मारियाना बेटांच्या जवळ आहे.

माउंट एव्हरेस्ट समुद्रसपाटीपासून 8,849 मीटर उंच आहे, तर मारियाना ट्रेंच समुद्र सपाटीपासून 11,000 मीटरपेक्षा जास्त खोल आहे. याची खोली माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा सुमारे 3 हजार मीटर अधिक आहे. म्हणजेच जर माउंट एव्हरेस्ट मारियाना ट्रेंचमध्ये बुडाला, तर त्याच्या शिखरावर 3 किलोमीटर पर्यंत समुद्राचे पाणी असेल.

माउंट एव्हरेस्टवर चढणे खूप कठीण आहे आणि आतापर्यंत या प्रयत्नात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही, असे बरेच लोक आहेत ज्यांनी जगातील सर्वोच्च शिखरावर ध्वज फडकवला आहे. पण, जगातील सर्वात खोल ठिकाण असलेल्या मारियाना ट्रेंचच्या तळाशी आतापर्यंत फक्त 2 लोक पोहोचू शकले आहेत.

1960 मध्ये निवृत्त यूएस लेफ्टनंट डॉन वॉल्श आणि त्याचा स्विस सहकारी जॅक पिकार्ड पाणबुडीतून सुमारे 10,790 मीटर खोलीपर्यंत गेले होते. तेव्हापासून कोणीही समुद्राच्या या अत्यंत खोलवर पोहोचू शकले नाही. या दोघांशिवाय आतापर्यंत इतर कोणीही मारियाना ट्रेंचच्या तळाशी गेलेलं नाही.